IPL 2026 Playoff: प्लेऑफमध्ये कोणते 4 संघ पोहोचणार? जाणून घ्या दहा संघांचं जय परायजाचं गणित
आयपीएल स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. आयपीएल स्पर्धेत सहा किंवा सात सामने खेळले आहेत. त्यामुळे आता येथून पुढे प्लेऑफची शर्यत आणखी तीव्र होत जाणार आहे. त्यामुळे टॉप चारमध्ये जागा मिळवण्यासाठी कोणाला किती संधी ते पाहून घेऊयात.

आयपीएल 2026 स्पर्धेची रंगत वाढली आहे. प्रत्येक संघाला या स्पर्धेत 14 सामने खेळायचे आहेत. त्यात आता बहुतांश संघाचे सात सामने खेळून झाले आहेत. त्यामुळे प्लेऑफच्या दृष्टीने पुढच्या काही सामन्यात चुरस वाढणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या संघाला किती सामने जिंकावे लागणार ते.
आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्स संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. पंजाब किंग्स संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. आतापर्यंत पंजाब किंग्सने 6 सामने खेळले असून त्यापैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे 11 गुण आहेत. पंजाब किंग्सला अद्याप आठ सामने खेळायचे आहेत. त्यामुळे आठ पैकी 2 सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफचं गणित सुटेल.
राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. आतापर्यंत खेळलेल्या 7 पैकी 5 सामन्यात विजय आणि 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. राजस्थान रॉयल्सच्या पदरात 10 गुण पडले आहे. आता उर्वरित सात पैकी 3 सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमध्ये जागा पक्की होईल.
गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघही या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. आरसीबीने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत आणि 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 2 सामन्यात पराभूत झाले आहेत. 8 गुण आणि +1.171 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहेत. आता उर्वरित 8 पैकी 4 सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. जर तसं झालं तर प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल.
सनरायझर्स हैदराबाद संघ 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादने 7 सामने खेळले, त्यापैकी 4 सामन्यात विजय आणि तीन सामन्यात पराभूत झाले. आता उर्वरित 7 सामन्यापैकी 4 साने जिंकणं भाग आहे. तसं झालं तर 16 गुणांसह सनरायझर्स हैदराबादचं प्लेऑफमध्ये जाणं पक्कं होईल.
दिल्ली कॅपिटल्स संघ पाचव्या स्थानावर असून 6 गुण आहे. खऱ्या अर्थाना या क्रमांकापासून खाली असलेल्या प्रत्येक संघाला प्लेऑफसाठी संघर्ष करावा लागणार आहे. प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी दिल्लीला आणखी 10 गुणांची कमाई करावी लागेल. उर्वरित 8 पैकी 5 सामने जिंकणं आवश्यक आहे.
दिल्ली कॅपिटल्ससारखीच काहीशी स्थिती गुजरात टायटन्सची आहे. त्यांनी 6 सामने खेळून तीन सामने जिंकले आहेत. सध्या 6 गुण असून उर्वरित 8 पैकी 5 सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. कारण 16 गुण असलेला संघ प्लेऑफमधील जागा पक्की करतो.
मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी खूपच कठीण परिश्रम करावे लागणार आहेत. मुंबई इंडियन्सने 6 सामने खेळले आणि 2 सामने जिंकले आणि 4 सामने गमावले. मुंबईच्या खात्यात 4 गुण आहेत. त्यामुळे मुंबईला 8 पैकी 6 सामने जिंकावे लागणार आहेत. तर आणि तरच 16 गुणांचं गणित सुटेल.
चेन्नई सुपर किंग्सची स्थिती मुंबईसारखी आहे. चेन्नई सुपर किंग्सने सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी 2 सामन्यात विजय मिळवले असून 4 गुण मिळवले आहेत. आता 8 सामने शिल्लक असून 6 सामन्यात विजय मिळवला तर 12 गुण होतील. गुणतालिकेत 16 गुण असलेला संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवतो. त्यामुळे चेन्नईसाठी आव्हान कठीण असणार आहे.
लखनौ सुपर जायंट्सला स्पर्धेत 7 सामने खेळले आहेत. त्यापैकी 5 सामन्यात पराभूत झाले आहेत आणि दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे 4 गुण आहेत. आता येथून पुढे 7 सामन्यात करो या मरोची लढाई आहे. कारण 7 पैकी 6 सामने जिंकणं भाग आहे. तर 16 गुणांचं गणित सुटू शकतो.
कोलकाता नाईट रायडर्सची स्थिती खूपच नाजूक आहे. कारण आतापर्यंत खेळलेल्या 7 पैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. आता पदरात 3 गुण पडले आहेत. त्यामुळे 7 पैकी 7 सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. जर एकही सामना गमावला तर गणित जर तर वर येईल.
