IND vs PAK: केवळ 1 धाव करुनही धोनीच्या नावावर मोठा विक्रम

वर्ल्‍ड कप 2019 मध्ये सर्वात बहुचर्चित सामन्यात भारताने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्‍तानला 89 धावांनी धूळ चारली. या सामन्यात माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एम. एस. धोनीने (MS Dhoni) केवळ 1 धाव काढली. तसेच कुणालाही झेलबाद किंवा यष्टीचित केले नाही, तरिही एक नवा विक्रम केला आहे.

IND vs PAK: केवळ 1 धाव करुनही धोनीच्या नावावर मोठा विक्रम

India vs Pakistan मँचेस्टर (इंग्लंड) : वर्ल्‍ड कप 2019 मध्ये सर्वात बहुचर्चित सामन्यात भारताने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्‍तानला 89 धावांनी धूळ चारली. या सामन्यात माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एम. एस. धोनीने (MS Dhoni) केवळ 1 धाव काढली. तसेच कुणालाही झेलबाद किंवा यष्टीचित केले नाही, तरिही एक नवा विक्रम केला आहे. रविवारच्या सामन्यात धोनीने मैदानावर उतल्यावर लगेचच सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम केला. धोनी आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

विश्वचषकातील रविवारचा सामना धोनीचा 341 वा एकदिवसीय सामना होता. धोनीने राहुल द्रविडला मागे टाकले आहे. द्रविडने 340 एकदिवसीय सामने खेळले होते. भारताकडून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने एकूण 463 एकदिवसीय सामने खेळले आहेत. इतके एकदिवसीय सामने खेळणारा सचिन जगातील एकमेव खेळाडू आहे.

माजी कर्णधार मोहम्‍मद अजहरुद्दीन 334 एकदिवसीय सामन्यांसह या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. माजी कर्णधार सौरव गांगुलीने 308 एकदिवसीय सामने खेळले असून तो पाचव्या क्रमांकावर आहे. यानंतर नुकतीच निवृत्ती घेतलेला क्रिकेटर युवराज सिंहचा क्रमांक येतो. युवराजने 301 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

धोनीचे एकदिवसीय क्रिकेटमधील विक्रम

धोनीने एकूण 344 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 341 भारतासाठी तर इतर आशिया इलेव्हनसाठी खेळल्या आहेत. धोनीच्या नावावर 50 पेक्षा अधिक सरासरीने 10,562 धावांची नोंद आहे. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 315 झेल टिपले आहेत आणि 121 यष्टीचित केले आहेत.

2005 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या एम. एस. धोनीने अल्पावधीत क्रिकेट विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले. प्रचंड चपळाईने खेळाडूला यष्टीचित करण्यात धोनी प्रसिद्ध आहे.

भारतानेही रविवारच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत नवा विक्रम केला. भारताने 1992 पासून आतापर्यंत विश्वचषक सामन्यात पाकिस्तानला सलग 7 वेळा पराभूत केले आहे.

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात; भारताने आपली विजयी परंपरा कायम ठेवली. इंग्लंडमधील मँचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात (old trafford stadium) झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या टीम इंडियाने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने वर्ल्डकपमध्ये आपणच बाप असल्याचं दाखवून दिलं.

पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात; पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने टॉस जिंकून प्रथम भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. रोहित शर्माच्या खणखणीत 140 धावा; के. एल. राहुलच्या 57; कर्णधार कोहलीच्या 77 धावांच्या जोरावर भारताने 50 षटकात 5 बाद 336 धावा केल्या.

भारताच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या पाकिस्तानी फलंदाजांना पावसामुळे दोन वेळा पवेलियनमध्ये परतावे लागले. अखेर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे पाकिस्तानला सुधारित 40 षटकात 302 धावांचे आव्हान मिळाले. ते आव्हनही पाकला पेलवले नाही आणि पाकिस्तान 40 षटकांमध्ये केवळ 212 धावा करु शकला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *