भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सराव, धोनी पाकिस्तानसाठी रणनीती आखत होता

न्युझीलंडसह भारताचे खेळाडू पाऊस संपून सामना जिंकण्याचा विचार करत होते. त्यासाठी आपली रणनीती आखत होते. मात्र, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी तेव्हा वेगळ्याच कामात व्यस्त होता.

भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सराव, धोनी पाकिस्तानसाठी रणनीती आखत होता


नॉटिंगहॅम : विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात आज एक वेगळेच दृष्य पाहायला मिळाले. न्युझीलंडसह भारताचे खेळाडू पाऊस संपल्यानंतर सामना जिंकण्याचा विचार करत होते. त्यासाठी आपली रणनीती आखत होते. मात्र, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी तेव्हा पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना पाहण्यात व्यस्त होता. त्यामुळे अनेकांना आश्चर्यही वाटले. मात्र, यामागेही धोनीचा एक ठोस हेतू होता.

प्रत्येक विश्वचषकात ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जाते तो सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. यावेळी तर परिस्थिती आणखी वेगळी असून भारत-पाक सामन्याचे महत्व खूप पटीने वाढले आहे. धोनीने सैन्याचे चिन्ह असलेले हँड ग्लोव्हज घातल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर आव्हान-प्रतिआव्हानेही देण्यात आली. क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांना धडा शिकवण्याचीही भाषा केली गेली. त्यामुळे या सामन्यात काय होणार? कुणाचे पारडे जड असणार आणि कोण विजयाचा मुकुट घालत पारंपारिक विरोधी संघाला चीतपट करणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानावर धोबीपछाड करण्यासाठी धोनी सज्ज?

भारत-पाकिस्तान सामन्याचे बदललेल्या संदर्भाची आणि पार्श्वभूमीची ‘कॅप्टन कुल’ धोनीला स्पष्ट कल्पना असून त्याच्यासाठी पाकिस्तानचा होणारा सामना अधिक महत्त्वाचा झाला आहे. पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानावर धोबीपछाड करण्यासाठी धोनी आत्तापासूनच कामाला लागला आहे. त्यासाठी त्याने रणनीतीही बनवायला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून धोनीने आज पावसाने खोळंबलेल्या सामन्यात वेळ न घालवता ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पाकिस्तानच्या काय चुका होतात? त्यांची शक्तीस्थाने काय आणि कमतरता काय याचा अभ्यास करण्यावर भर दिला. यासाठी पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना चांगली संधी असल्याचेही धोनीने हेरले आणि हा वेळ कारणी लावला. आता या रणनीतीचा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कसा उपयोग होतो ते येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

पावसाने भारत-न्यूझीलंड सामन्यात नाणेफेकही झाली नाही

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 वर पावसाचे सावट कायम आहे. याचा पहिला फटका आज भारताला बसला. आजच्या भारत आणि न्यूझीलंडमधील सामन्यात पावसाने अशी हजेरी लावली की सामन्यासाठी नाणेफेकही न करता सामना रद्द करावा लागला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI