पाकिस्तानचा पत्ता कट, भारताचा सेमीफायनल इंग्लंड किंवा न्यूझीलंडविरुद्ध

अखेर पाकिस्तानला चमत्कार घडवणारी खेळी करण्यात अपयश आल्याने न्यूझीलंड चौथा संघ म्हणून सेमीफायनलसाठी क्वालीफाय झाला आहे. गुणतालिकेत सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताचा सेमीफायनल इंग्लंड किंवा न्यूझीलंडविरुद्ध होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानचा पत्ता कट, भारताचा सेमीफायनल इंग्लंड किंवा न्यूझीलंडविरुद्ध

लंडन : विश्वचषकातील अंतिम चार संघ निश्चित झाले आहेत. बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर चौथा संघ ठरणार होता. पण यासाठी पाचव्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानची अग्निपरीक्षा होता. अखेर पाकिस्तानला चमत्कार घडवणारी खेळी करण्यात अपयश आल्याने न्यूझीलंड चौथा संघ म्हणून सेमीफायनलसाठी क्वालीफाय झाला आहे. गुणतालिकेत सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताचा सेमीफायनल इंग्लंड किंवा न्यूझीलंडविरुद्ध होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानने सुरुवातीला फलंदाजी करत बांगलादेशसमोर विजयासाठी 316 धावांचं आव्हान दिलं. पण पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये खेळायचं असेल तर एखाद्या अभूतपूर्व खेळीची आवश्यकता होती. पाकिस्तानने 316 धावांचं आव्हान दिल्यामुळे बांगलादेशला फक्त 6 धावात बाद करणं अनिवार्य बनलं. त्यामुळे पाकिस्तानची सेमीफायनलची आशा मावळली.

कसं आहे सेमीफायनलचं चित्र?

गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. पण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा एक-एक सामना बाकी आहे. ऑस्ट्रेलियाचा उद्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, तर भारताचाही उद्याच श्रीलंकेविरुद्ध सामना होईल. यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. सध्या 14 गुण असलेल्या ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यास अव्वल स्थान कायम राहिल. भारताने श्रीलंकेला हरवलं तरीही काही फरक पडणार नाही. कारण, भारताच्या नावावर सध्या 13 गुण असून विजयानंतर 15 म्हणजे ऑस्ट्रेलियापेक्षा एक गुण कमीच असेल.

सध्या आहे हीच परिस्थिती राहिल्यास भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल होईल. पहिल्या आणि चौथ्या संघाचा, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या संघाचा सेमीफायनल होणार आहे. सेमीफायनलमध्ये विजयी होणारे दोन संघ 14 जुलैला होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.

या विश्वचषकातील चार संघांची कामगिरी

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, ज्यापैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. ऑस्ट्रेलियाचा एकमेव पराभव भारताविरुद्ध झाला होता. ऑस्ट्रेलियाचा आणखी एक सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल.

भारताने आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये 6 विजय मिळवले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता, तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला, ज्यानंतर दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला होता. भारताचा पुढील आणि शेवटचा सामना श्रीलंकेसोबत होत आहे.

इंग्लंडने आपल्या 9 सामन्यांपैकी 6 विजय मिळवले, तर 3 सामन्यांमध्ये पराभव झाला. यजमान इंग्लंडने 3 सामने गमावल्याने सेमीफायनलपर्यंत पोहोचणार की नाही याबाबतचीही धाकधूक वाढली होती. पण भारताचा पराभव केला आणि त्यानंतर न्यूझीलंडवर मात करुन इंग्लंडने सेमीफायनलचं तिकीट बूक केलं.

न्यझीलंडने या विश्वचषकात जबरदस्त सुरुवात केली होती. न्यूझीलंडने 9 सामन्यांपैकी दोन सामने गमावले आहेत, ज्यापैकी एका सामन्यात ऑस्ट्रेलिया, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *