News9 Corporate Badminton Championship 2025 : 9 मे पासून रंगणार कॉर्पोरेट बँडमिंटन चॅम्पियनशीपचा थरार, पी गोपीचंद यांच्यासह न्यूज9 चा प्रवास
News9 Corporate Badminton Championship 2025 : न्यूज9 कडून आयोजित करण्यात आलेल्या कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेतील सामने हैदराबादमधील पी गोपीचंद अकॅडेमी येथे खेळवण्यात येणार आहेत. ही स्पर्धा एकूण 3 दिवस रंगणार असून 9 ते 11 मे दरम्यान सामने खेळवण्यात येणार आहेत.

न्यूज9 च्या वतीने काही महिन्यांपूर्वी कॉर्पोरेट फुटबॉल कप आणि इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. न्यूज9 कडून या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. पद्मश्री पुलेला गोपीचंद यांच्या सहकार्याने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पी गोपीचंद हे बॅडमिंटनमधील दिग्गज प्रशिक्षक आणि माजी खेळाडू आहेत. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी अनेकांना बॅडमिंटनचे धडे दिले. दिग्गज प्रशिक्षकाने हैदराबादमधील पी गोपीचंद अकॅडेमीत अनेक खेळाडूंना बॅडमिंटनची बाराखडी शिकवली. याच एकेडमीत न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. एकूण 3 दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. येत्या 9 ते 11 जून दरम्यान बॅडमिंटन स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत.
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पी गोपीचंद अकॅडेमी
हैदराबादमधील पी गोपीचंद अकॅडेमी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. या अकॅडेमीत विश्व स्तरावरील 23 बॅडमिंटन कोर्ट आहेत. या अकॅडेमीत अनेक दिग्गजांकडून प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळेच न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचं आयोजन हे या अकॅडेमीत करण्यात आलं आहे.
खेळाडू म्हणून उल्लेखनीय कामगिरी
पी गोपीचंद यांनी खेळाडू म्हणून उल्लेखनीय कामगिरी करत स्वत:सोबत भारताचं नावही उंचावलं आहे. गोपीचंद यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धा जिंकल्यात. गोपीचंद यांनी 1996 साली पहिल्यांदा नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत विजय मिळवला होता. विशेष म्हणजे गोपीचंद यांनी 1996 ते 2000 पर्यंत सलग 5 वेळा या स्पर्धेत विजय मिळवत इतिहास घडवला होता.
गोपीचंद यांनी 1998 साली इंफाळमध्ये आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक मिळवलं होतं. तसेच गोपीचंद यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर 3 वेळा थॉमस कप स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. गोपीचंद यांनी 1996 साली विजयवाडा येथे आयोजित सार्क बॅडमिंटन स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलं होतं.
गोपीचंद यांनी 1998 साली राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक प्रकारात रौप्य आणि पुरुष एकेरीत कांस्य पदक मिळवलं. त्याशिवाय 1999 साली फ्रांसमध्ये टूलुज ओपन चॅम्पियनशीप आणि स्कॉटिश ओपन चॅम्पिनशीप स्पर्धेत विजय मिळवला. त्यानंतर हैदराबादमध्ये आशियाई सॅटेलाईट स्पर्धेतही विजय मिळवला. गोपीचंद यांनी 2001 साली बर्मिंगघम येथे ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
अनेक पुरस्काराने सन्मान
बॅडमिंटन या खेळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी पी गोपीचंद यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय . पी गोपीचंद यांना 2000 साली अर्जुन पुरस्कार तर 2001 साली खेळरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्याशिवाय 2005 साली पद्मश्री, 2009 साली द्रोणाचार्य पुरस्कार आणि 2014 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच 2019 या वर्थात आंतरराष्ट्रीय ऑल्मिपिक समिती लाईफटाईम अचीव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केलं गेलं.
पी गोपीचंद यांनी खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतरही बॅडमिंटनची सेवा कायम ठेवली. पी गोपीचंद यांनी कोच म्हणून नव्या इनिंगला सुरुवात केली. त्यांनी हैदराबादमध्ये पी गोपीचंद अकॅडेमीची 2008 साली स्थापना केली. गोपीचंद यांनी या अकॅडेमीत पीव्ही सिंधू,सायना नेहवाल, चिराग शेट्टी, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि लक्ष्य सेन् यासारखे दिग्गज खेळाडू घडवले. गोपीचंद यांच्या मुशीत तयार झालेल्या या सर्व खेळाडूंनी भारताचं ऑल्मिपिकमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच काही खेळाडूंनी पदकही मिळवलं आहे.
