मलिंगाच्या नो बॉलवरुन कोहली, तर बुमराहच्या वाईडवरुन रोहितचा अंपायरवर संताप

मलिंगाच्या नो बॉलवरुन कोहली, तर बुमराहच्या वाईडवरुन रोहितचा अंपायरवर संताप

RCBvMI बंगळुरु: रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात गुरुवारी रोमहर्षक लढत झाली. या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अवघ्या 6 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारे मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकात 8 बाद 187 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना विराटच्या आरसीबीला 5 बाद 181 धावांपर्यंतच मजल मारता आली. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला.

शेवटच्या चेंडूवरुन वाद

या सामन्यातील शेवटच्या चेडूंवरुन वाद निर्माण झाला आहे. शेवटच्या चेंडूवर आरसीबीला 7 धावांची गरज होती. मात्र मुंबईच्या मलिंगाने टाकलेला तो चेंडू नो बॉल असूनही, अंपायरने दिला नाही. त्यामुळे विराट कोहली चांगलाच वैतागला.

शेवटच्या चेंडूवर आरसीबीने केवळ 1 धावा घेतल्याने मुंबईचा 6 धावांनी विजय झाला.

शेवटच्या षटकात लसिथ मलिंगाने गोलंदाजी केली. शेवटच्या चेंडूवर फलंदाजीसाठी शिवम दुबे मैदानात होता. मलिंगाने बॉल फेकला तेव्हा त्याचा पाय क्रीजबाहेर गेला, पण अंपायरचं लक्ष्य न गेल्याने तो नो बॉल देण्यात आला नाही. त्यामुळे आरसीबीला हा सामना गमवावा लागला.

अंपायरच्या या निर्णयामुळे कर्णधार विराट कोहलीने नाराजी वर्तवली आहे. आपण आयपीएल क्रिकेट खेळतोय, कोणतं क्लब क्रिकेट नाही. शेवटच्या चेंडूवर जे झालं ते चुकीचं होतं. पंचांनी आपले डोळे उघडे ठेवायला हवेत, हे असं का होतंय, त्याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं, असं कोहली म्हणाला.

दरम्यान, हा सामना संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, “मला आता समजलं की मलिंगाने क्रीज पार केलं होतं. अशा गोष्टी क्रिकेटसाठी चांगल्या नाहीत”.

यावेळी रोहितने बुमराहच्या गोलंदाजीवर अंपायरनने दिलेल्या निर्णयावरही आक्षेप घेतला. बुमराहने टाकलेला चेंडू जो वाईड नव्हता, तो वाईड दिला, ते निराशाजनक होतं, असं रोहित म्हणाला.

दरम्यान, जर मलिंगाने टाकलेला शेवटचा चेंडू जर नो बॉल दिला असता, तर एक चेंडू आणखी खेळायला मिळाला असता, शिवाय एक अतिरिक्त रन आणि फ्री हिट मिळाली असती. त्यामुळे स्ट्राईकवर आलेल्या ए बी डिव्हिलियर्सने कदाचित निकाल बदलला असता, असा आरसीबीच्या चाहत्यांचा दावा आहे.

Published On - 9:56 am, Fri, 29 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI