इरफान पठाण-मनप्रीत गोनीने इंग्लिश गोलंदाजांना धुतलं, 24 चेंडूत ठोकले 7 षटकार

'रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंग्लंड लेजेंड्सच्या संघाने इंडिया लेजेंड्सचा विजयी रथ रोखला आहे. (Road safety world series)

इरफान पठाण-मनप्रीत गोनीने इंग्लिश गोलंदाजांना धुतलं, 24 चेंडूत ठोकले 7 षटकार
Manpreet Gony and Irfan Pathan

रायपूर : ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंग्लंड लेजेंड्सच्या संघाने इंडिया लेजेंड्सचा विजयी रथ रोखला आहे. केविन पीटरसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंड लेजेंड्सने उभय संघांमध्ये खेळवण्यात आलेला रोमांचक सामना सहा धावांनी जिंकला. 188 धावांचा पाठलाग करताना इंडिया लेजेंड्सने 119 धावांत 7 गडी गमावले होते. पण त्यानंतर इरफान पठाण (61) आणि मनप्रीत गोनी (35) यांच्या वादळी खेळीने इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलेच दमवले. या दोघांनीही अखेरच्या 26 चेंडूत 63 धावा फटकावल्या. परंतु त्यांची खेळी व्यर्थ गेली. दोघांच्या वादळी खेळीनंतरही टीम इंडिया लेडेंड्स संघ विजयापासून सहा धावा दूर राहिला. संघाने सात विकेट्सच्या बदल्यात 182 धावा केल्या. इंग्लंड लेजेंड्सचा कर्णधार केविन पीटरसन (75) आणि फिरकीपटू मॉन्टी पानेसर (तीन विकेट) हे दोघे इंग्लंडच्या विजयाचे नायक ठरले.

189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवाग (06), मोहम्मद कैफ (01), सचिन तेंडुलकर (09) यांच्या रुपात अवघ्या 17 धावात टीम इंडिया लेजेंड्स संघाचे टॉप ऑर्डर बॅट्समन पव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर मैदानात आलेल्या युवराज सिंग आणि सुब्रमण्यम बद्रीनाथ यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण रयान साइडबॉटमने बद्रीनाथला आठ धावांवर बोल्ड केले. युवराज खेळपट्टीवर स्थिरावतोय, असे जाणवत असताना मॉन्टी पानेसरने त्याला बाद केले. युवराजने तीन चौकारांच्या सहाय्याने 22 धावा फटकावल्या. सामना भारताच्या हातून निसटला आहे, असे दिसू लागले होते, परंतु युसुफ आणि इरफान पठाण या दोन भावांनी 43 धावांची चांगली भागीदारी केली. युसुफ बाद झाल्याने ही भागीदारी तुटली. जेम्स ट्रेडवेलने युसुफची विकेट घेतली.

गोनी-इरफानचा सामना वाचवण्यासाठी प्रयत्न

विकेटकीपर फलंदाज नमन ओझा 12 धावा काढून बाद झाला. परंतु त्यानंतर मैदानात आलेल्या मनप्रीत गोनीने इंग्लंडच्या चेहऱ्यावरचे हसू हिरावले. आधी गोनीने ख्रिस स्कोफिल्डच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला. त्यानंतर इरफानने 18 व्या षटकात जेम्स ट्रेडवेलच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार ठोकले. दरम्यान इरफानने 30 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्याच षटकात गोनीनेही एक षटकार लगावला. यासह अखेरच्या दोन षटकांत भारताला विजयासाठी 38 धावांची आवश्यकता होती. 19 व्या षटकात गोनीने ख्रिस ट्रॅमलेटच्या षटकात 19 धावा लुटल्या. त्याने एक चौकार आणि दोन षटकार लगावले.

अखेरच्या तीन चेंडूत सामना निसटला

शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 19 धावांची आवश्यकता होती. रायन साइडबॉटमने भारताला ते आव्हान पूर्ण करु दिले नाही. या षटकात इरफानने पहिल्या दोन चेंडूत चार धावा केल्या. तिसर्‍या चेंडूवर त्याने षटकार ठोकला. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये भारताला 9 धावांची गरज होती. परंतु भारताला या तीन चेंडूत केवळ दोनच धावा करता आल्या. इरफानने 34 चेंडूत नाबाद 61 धावा फटकावल्या. त्याने 4 चौकार आणि 5 षटकार लगावले. तर गोनीने 16 चेंडूत 1 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 35 धावा केल्या.

तत्पूर्वी केविन पीटरसनच्या 75 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने सात विकेट्सच्या बदल्यात 188 धावांचा डोंगर उभा केला. पीटरसनने 18 चेंडून अर्धशतक फटकावले होते.

Published On - 11:50 am, Wed, 10 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI