रोहित शर्माने श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याचा 22 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे सामन्यात विजय मिळवून, भारताने वन डे मालिकाही 2-1 ने खिशात घातली.

रोहित शर्माने श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याचा 22 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

कटक : टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma break Sanath Jayasuriya record) श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याचा 22 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे. एक वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सलामीवीर रोहित शर्माने आपल्या नावे केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे सामन्यात विजय मिळवून, भारताने वन डे मालिकाही 2-1 ने खिशात घातली. (Rohit Sharma break Sanath Jayasuriya record)

शेवटच्या वन डे सामन्यात रोहित शर्माने 63 धावा केल्या. जयसूर्याचा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माला या सामन्यात 9 धावांची गरज होती. जयसूर्याने 1997 मध्ये 2387 धावा केल्या होत्या. रोहितने या सामन्यात 63 धावा ठोकत यंदाच्या वर्षात 2442 धावा केल्या.

रोहितने यंदा 47 डावांमध्ये 53.08 च्या सरासरीने सर्व फॉरमॅटमध्ये 10 शतकं आणि 10 अर्धशतकं ठोकली. एका वर्षात उत्तम कामगिरी करणाऱ्या सलामीवीरांमध्ये भारताचा वीरेंद्र सेहवाग (2008 मध्ये 2355 धावा) आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनचा (2003 मध्ये 2349 धावा) समावेश आहे.

दरम्यान, रोहित शर्मा वन डे सामन्यांमध्ये एक वर्षात 1490 धावा करुन अव्वलस्थानी विराजमान आहे.

भारताचा वेस्ट इंडिजवर विजय

दरम्यान, कटक इथे झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम वन डे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 4 विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने भारताला 316 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहुल यांनी शतकी सलामी दिली. रोहित शर्माने 63 तर राहुलने 77 धावा केल्या. या विजयात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मोलाची भूमिका बजावली. कोहलीने 85 धावा केल्या. तर रवींद्र जाडेजाने शार्दूल ठाकूरला हाताशी घेऊन भारताला विजय मिळवून दिला. जाडेजाने नाबाद 39 तर शार्दूल ठाकूरने गरजेच्या वेळी धडाकेबाज खेळी करत 6 चेंडूत 17 धावा ठोकल्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *