बॅटिंग कोचपदावरुन हटवल्याने संजय बांगरच्या संतापाचा स्फोट, सिलेक्टरच्या रुममध्ये घुसून दमदाटी

टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदावरुन माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची सुट्टी झाल्यानंतर बांगर यांच्या संतापाचा स्फोट झाला. त्यांनी निवड समितीचे सदस्य देवांग गांधी यांच्या रुममध्ये जाऊन वाद घातल्याची माहिती समोर आली आहे

बॅटिंग कोचपदावरुन हटवल्याने संजय बांगरच्या संतापाचा स्फोट, सिलेक्टरच्या रुममध्ये घुसून दमदाटी

मुंबई : टीम इंडियाचे बॅटिंग कोच संजय बांगर (Sanjay Bangar) यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ स्थगित करण्यात आला आहे. पाच वर्षांच्या सेवेनंतर अविश्वासाचा ठपका ठेवण्यात आल्यामुळे बांगर यांच्या संतापाचा स्फोट झाला. दोन आठवड्यांपूर्वी संजय बांगर यांनी एका निवडकर्त्याच्या (Team India National Selector) खोलीत घुसून वाद घातला होता, असा दावा केला जात आहे.

टीम इंडियाचे राष्ट्रीय सिलेक्टर देवांग गांधी यांच्या रुममध्ये घुसून संजय बांगर यांनी आगपाखड केली होती, असं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने छापलं आहे. ‘दोन आठवड्यांपूर्वी संजय बांगर टीम इंडियाच्या राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य देवांग गांधी यांच्या रुममध्ये घुसले. फलंदाजी प्रशिक्षकपदावरुन आपल्याला हटवल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.’ असं या वृत्तात म्हटलं आहे.

निवड समिती मुलाखत घेत असताना संजय बांगर यांनी रुमचा दरवाजा ठोठावला आणि समितीला चांगलंच सुनावलं. संपूर्ण भारतीय संघ आपल्या पाठीशी उभा राहील आणि मला हटवण्याचा तुमचा निर्णय तुमच्याच अंगलट येईल, असंही बांगर यांनी सांगितल्याचं म्हटलं जात आहे. बॅटिंग प्रशिक्षकपदावरुन हटवल्यास नॅशनल क्रिकेट अकादमीत तरी पाठवावं, असं बांगर म्हणाल्याचं वृत्त आहे.

प्रशिक्षकपदावरुन संजय बांगर यांची सुट्टी, माजी सलामीवीराला संधी

संजय बांगर यांच्या वर्तणुकीमुळे ‘बीसीसीआय’ही नाराज आहे. याविषयी प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांच्या कानावर घालण्यात आलं आहे. बांगर यांच्याविरोधात काय कारवाई केली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कोण आहेत संजय बांगर?

संजय बांगर यांनी महाराष्ट्र आणि मुंबई क्रिकेट युवक संघांकडून कारकीर्दीला सुरुवात केली. 1993-94 सालातील हंगामापासून ते रेल्वे संघाकडून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले. रेल्वे संघाला रणजी करंडक स्पर्धेच्या (2000-01) हंगामात उपविजेतेपद आणि 2001-02 च्या हंगामात विजेतेपद मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

बांगर यांच्या अष्टपैलू कामगिरीने 2002 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघात त्यांची वर्णी लागली. भारताकडून संजय बांगर यांनी 12 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी 12 कसोटीत 470 धावा केल्या असून सात बळीही घेतले. तसेच झिम्बाब्वेविरुद्ध त्यांनी शतकी खेळी केली होती.

2002 मध्ये यजमान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 68 धावांची झुंजार खेळी करताना भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडसोबत 170 धावांची भागीदारी केली होती. 2003 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम फेरीत खेळणाऱ्या संघात ते होते. 1 जानेवारी 2013 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून त्यांनी निवृत्तीची घोषणा केली.

विक्रम राठो़ड यांची वर्णी

माजी सलामीवीर फलंदाज विक्रम राठोड हे भारतीय क्रिकेट संघाचे नवे फलंदाजी प्रशिक्षक असतील. 50 वर्षीय विक्रम राठोड यांनी भारताकडून 1996 मध्ये 6 कसोटी सामने आणि 7 वन डे सामने खेळले. यामध्ये त्यांना खास कामगिरी करता आली नाही. रणजी क्रिकेटमध्ये त्यांनी पंजाबकडून चांगली कामगिरी केली होती. ते काही वर्षांपूर्वी म्हणजे 2016 पर्यंत संदीप पाटील यांच्या नेतृत्त्वातील बीसीसीआयच्या निवड समितीचे सदस्यही होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *