‘निर्बुद्ध सरफराज, स्वतःचा डोकं वापरत नाही’, पराभवानंतर शोएब अख्तरचा हल्लाबोल

विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यानंतर पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमदवर चहुबाजूने टीका होत आहे.

‘निर्बुद्ध सरफराज, स्वतःचा डोकं वापरत नाही’, पराभवानंतर शोएब अख्तरचा हल्लाबोल

इस्लामाबाद: विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यानंतर पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमदवर चहुबाजूने टीका होत आहे. आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तर देखील सरफराजवर संतापला आहे. त्याने सरफराज अहमदला थेट निर्बुद्धच म्हटले आहे.

विश्वचषकात भारताकडून पाकिस्तानच्या पराभवाचे सत्र सुरुच आहे. भारताने विश्वचषकात सलग सातव्यांदा पाकिस्तानला धूळ चारली. मॅनचेस्‍टरमधील मैदानावर भारताने पाकिस्तानचा एकतर्फी 89 धावांनी पराभव केला. यानंतर पाकिस्‍तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्‍तर चांगलाच संतापला आणि त्याने सरफराज ‘ब्रेनलेस’ असल्याची टीका केली. शोएब अख्तर म्हणाला, “कुणी इतका निर्बुद्ध कर्णधार कसा असु शकतो हे मला कळत नाही. आपली धावांची पाठलाग करण्यातील कामगिरी चांगली नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट असताना मैदान ओले होत नाही, कोरडे राहते. या सर्व गोष्टी आणि पाकिस्तान संघाची ताकद याचा विचार करुन आपली ताकद फलंदाजी नाही, तर गोलंदाजी आहे इतकाही विचार सरफराजला करता आला नाही.”

“निर्बुद्ध कर्णधार, निर्बुद्ध व्यवस्थापन”

शोएबने देखील सरफराजला पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याप्रमाणेच नाणेफेक जिंकून फलंदाजीचा सल्ला दिला होता. मात्र, सरफराजने गोलंदाजीचा निर्णय घेतला. शोएब म्हणाला, “पाकिस्तानने जेव्हा नाणेफक जिंकली तेव्हाच अर्धा सामना जिंकला होता. मात्र, पाकिस्तानने काय केले? त्यांनी हा सामना जिंकू नये यासाठीच प्रयत्न केला. निर्बुद्ध कर्णधार, निर्बुद्ध व्यवस्थापन.”

‘सरफराज दहावीच्या मुलांप्रमाणे व्यवस्थापनासमोर मिंधा’

शोएबने कर्णधार सरफराजसह व्यवस्थापनालाही झाडले. तो म्हणाला, “कर्णधारला मी काय म्हणू. तो व्यवस्थापनासमोर अगदीच मिंधा झाला आहे. त्याला काहीही समजत नाही. दहावीच्या वर्गातील मुलाप्रमाणे तो व्यवस्थापन जे सांगेल तेच करुन येतो. इम्रान खान यांनी इतके ट्वीट केले. मात्र, त्यांनी विचार करायला हवा होता की ज्यांच्यात क्षमता आहे त्यांच्यासाठीच ट्विट करायला हवेत.”

‘सरासरी खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा’

पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर नाराज शोएब पुढे म्हणाला, “माझ्या मते आम्ही चूक करत आहोत. आम्ही आमच्या सरासरी खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा करत आहोत. आम्ही आमचे रक्त आटवत आहोत. खूप पश्चाताप होतो आहे. पाकिस्तानने चांगला सामना आपल्या हातातून गमावला याचे दुःख होते. जर पाकिस्तानने फलंदाजी करत 320 धावांचे लक्ष्य ठेवले असते तर मग भारतीय संघावर दबाव कसा आला नसता हे मी पाहिले असते.”


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI