Mohammed Siraj : सिराजची घाई अंगाशी आली असती, शुबमन गिलने केली पोलखोल
ओव्हल कसोटी सामना जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. त्याची घाई टीम इंडियाला महागात पडणार होती. कर्णधार शुभमन गिलने स्वतः हा खुलासा केला आहे.

टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धचा शेवटचा कसोटी सामना, रोमांचक स्थितीत जिंकला आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. एक वेळ अशी आली होती की, यजमान इंग्लंड संघ विजयाच्या अगदी जवळ होता, पण वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या शानदार गोलंदाजीने इंग्लंडच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.ओव्हल कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी, मोहम्मद सिराजने एकूण 3 विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडला मालिका जिंकण्यापासून रोखले. परंतु सामन्यादरम्यान सिराजची घाई भारतीय संघाला महागात पडू शकली असती, असे सांगत कर्णधार शुभमन गिलने पत्रकार परिषदेत पोलखोल केली.
शेवटी सिराजने काय केलं ?
ओव्हल कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला जिंकण्यासाठी 35 धावा करायच्या होत्या आणि त्यांच्या हातात 4 विकेट शिल्लक होत्या. पण टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी इंग्लंडला 35 धावा करू दिल्या नाहीत आणि 6 धावांनी हा सामना जिंकला. मात्र याच काळात सिराज विकेट घेण्यासाठी खूप घाई करत होता. कर्णधार शुभमन गिलने हा खुलासा केला आहे.
झालं असं की इंग्लंडच्या दुसऱ्या डावात, क्रीजवर गस ॲटकिन्सन आणि ख्रिस वोक्स यांची शेवटची जोडी खेळत होती. 84 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद सिराज वाइड यॉर्कर टाकणार होता. त्याने कर्णधार शुभमन गिलला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलला एक ग्लोव्ह काढायला सांगायला सांगितलं, पण शुभमन गिल हा मेसेज जुरेलला देणार तोपर्यंत सिराज गोलंदाजी करण्यासाठी धावला होता. यामुळे, जुरेलला त्याचे ग्लोव्ह्ज काढायला वेळच मिळाला नाही. ॲटकिन्सन हा चेंडू खेळू शकला नाही आणि चेंडू जुरेलच्या ग्लोव्ह्जमध्ये गेला, तरीही दोन्ही फलंदाजांनी धावा चोरल्या. या दरम्यान, जुरेलने ख्रिस वोक्सला धावबाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो तसे करू शकला नाही. या गोष्टीचा खुलासा शुबमन गिलने प्रेस कॉन्फरन्समध्ये केला.
काय म्हणाला गिल ?
गिल म्हणाला, मी सिराजचा संदेश जुरेलला दिला तोपर्यंत सिराजने गोलंदाजी करण्यासाठी धावण्यास सुरुवात केली होती. यामुळे ध्रुव जुरेलला त्याचे ग्लोव्ह्ज काढण्याची संधीच मिळाली नाही. जेव्हा दोन्ही फलंदाजांनी धाव घेतली तेव्हा सिराज माझ्याकडे आला आणि म्हणाला, तू जुरेलला त्याचे ग्लोव्ह्ज काढण्यास का सांगितलं नाहीस? गिलने पत्रकार परिषदेत हा किस्सा सांगितला, तेव्हा त्याच्या शेजारी बसलेला सिराज हसत होता.
Shubman Gill said “Jab tak mene dhruv ko bola ye(Siraj )bhagne lag gaya aur usko time ni mila” 😂
(This happened when Dhruv missed the run out in the 3rd last over)pic.twitter.com/MA5NG6urB8
— GURMEET GILL 𝕏 (@GURmeetG9) August 4, 2025
सिराजने काय सांगितलं ?
यादरम्यान, सिराजने शुभमन गिलसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल सांगितले. पत्रकार परिषदेत मोहम्मद सिराज म्हणाला की, गिल आणि माझे खूप चांगले संबंध आहेत. आम्ही बऱ्याच काळापासून एकत्र खेळत आहोत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये आम्ही एकाच संघात आहोत. म्हणूनच आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे. गिलची सध्या प्रगति होत आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. ओव्हल कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी, मोहम्मद सिराजने तीन विकेट्स घेतल्या आणि टीम इंडियाला 6 धावांनी थरराक विजय मिळवून दिला. या विजयासह, भारतीय संघाने मालिका 2-2 अशी बरोबरीत संपवली.
