SRH vs RCB : हैदराबादचा बॅटिंगचा निर्णय, टॉप 2 साठी आरसीबी विरुद्ध किती धावांनी जिंकावं लागणार? जाणून घ्या
Sunrisers Hyderabad Top 2 Scenario, IPL 2026 : सनरायझर्स हैदराबाद टीमने आरसीबी विरुद्ध निर्णायक आणि अटीतटीच्या सामन्यात बॅटिंगचा निर्णय घेतलाय. जाणून घ्या हैदराबादला हा सामना किती धावांच्या फरकाने जिंकावा लागणार.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 67 व्या सामन्यात सनराझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स याने टॉस जिंकला आहे. पॅटने आरसीबी विरुद्ध बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचं आयोजन हे हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. आरसीबी आणि हैदराबाद दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील 14 वा आणि शेवटचा सामना आहे. दोन्ही संघांनी प्लेऑफचं तिकीट मिळवलंय. मात्र त्यानंतरही हैदराबादसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.
पॉइंट्स टेबलमधील पहिल्या 2 संघांना अंतिम फेरीत पोहचण्याची 1 अतिरिक्त संधी मिळते. त्यामुळे प्लेऑफसाठी पात्र ठरेलल्या संघांचा टॉप 2 मध्ये राहण्याचा प्रयत्न असतो. आरसीबीने सर्वात आधी प्लेऑफचं तिकीट मिळवलं. तसेच आरसीबी भक्कम नेट रनरेटसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. तर गुजरातने 21 मे रोजी चेन्नईला पराभूत करुन आपलं दुसरं स्थान भक्कम केलं. हैदराबाद पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी कायम आहे. तर प्लेऑफमधील एका जागेसाठी चुरस कायम आहे.
त्यामुळे आता हैदराबाद टीमला टॉप 2 मध्ये राहून अंतिम फेरीत पोहचण्याची अतिरिक्त संधी मिळवण्यासाठी आरसीबी विरुद्ध किती फरकाने सामना जिंकावा लागणार? हे जाणून घेूऊयात.
हैदराबादचं टॉप 2 समीकरण
गुजरातला मागे टाकून टॉप 2 मध्ये पोहचण्यासाठी हैदराबादला हा सामना 83 ते 89 धावांच्या फरकाने जिंकावा लागणार आहे. तसेच आरसीबीने हा सामना जिंकला तर ते टॉप 2 मध्ये कायम राहतील. तसेच आरसीबीचा पराभव झाला तरी त्यांना फरक पडणार नाही. मात्र आरसीबीचा पराभव 83 पेक्षा कमी धावांनी व्हायला हवा. त्यामुळे आता या अटीतटीच्या सामन्यात कोण मैदान मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आरसीबीरकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. नियमित कर्णधार रजत पाटीदार याचं कमबॅक झालं आहे. रजतच्या कमबॅकमुळे जेकब बेथल याला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर व्हावं लागलं आहे. जितेश शर्मा याने रजत पाटीदार याच्या अनुपस्थितीत गेल्या सामन्यात पंजाब विरुद्ध आरसीबीचं नेतृत्व केलं होतं. तर दुसऱ्या बाजूला सनरायझर्स हैदराबादने त्याच प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, जितेश शर्मा (विकेटकीपर), क्रुणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, सुयश शर्मा आणि रसिक सलाम दार.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, स्मरण रवीचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कॅप्टन), शिवांग कुमार, एशान मलिंगा आणि साकिब हुसैन.
