
T20 World Cup 2026 : बीसीसीआयच्या निर्देशानंतर कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायजीने त्यांच्या टीममधला बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमान याला काढून टाकल्याने आगामी आयपीएल (IPL 2026) स्पर्धेतून त्याचा पत्ता कट झाला. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या वाढत्या अत्याचरानंतर आयपीलमध्ये बांगलादेशी खेळाडूला विरोध होऊ लागला आणि त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. मात्र तेव्हापासूनच बांगलादेशची भूमिका बदलली. त्यांना अचानक भारतात खेळणं असुरक्षित वाटायला लागलं आणि त्यांनी आगामी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतात न खेळण्याची भूमिका स्वीकारली. आयसीसी चर्चांचा फैरी झ़डूनही बीसीबी (बांगलादेश क्रिकेट बोर्ड) त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले, मात्र आयीसीसने वेळ आणि व्हेन्यू बदलण्यास नकार दिला.
अखेर बांगलादेशने (Bangladesh) टी20 वर्ल्ड कप 2026 (T 20 world cup) मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. भारतातील सुरक्षा परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही आणि हा निर्णय सरकारचा आहे असे युवा आणि क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यासोबतच त्यांनी आयसीसीवर अन्याय केल्याचा आरोपही केला. जागतिक क्रिकेट मंडळाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी म्हटले. मात्र यामुळे आता बांगलदेश क्रिकेट बोर्डाला मोठा फटका बसणार असून त्यांचं भारी नुकसानही होणार आहे. भारतात होणाऱ्या या मेगा स्पर्धेत खेळण्यास नकार दिल्यानंतर, बांगलादेशचे केवळ क्रिकेटच्या दृष्टीनेच नुकसान होणार नाहीयेतर तर या निर्णयामुळे त्यांना मोठी आर्थिक किंमतही मोजावी लागेल.
बीसीबीची भूमिका
आगामी टी-20 वर्ल्डकप ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करत असल्याने, बीसीबीने आयसीसीला बांगलादेशचे गट सामने श्रीलंकेत हलविण्याची विनंती केली होती. परंतु आयसीसी बोर्डाच्या बैठकीत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आणि भारतात सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले. जर ते भारतात आले नाहीत तर त्यांच्या जागी दुसऱ्या संघाचा समावेश केला जाईल असा अल्टिमेटम आयसीसीने बीसीबीला दिला होता. तरीही, बांगलादेशने आपला निर्णय अंतिम ठेवला आणि सांगितलं की त्यांना विश्वचषक खेळायचा आहे, पण भारतात नाही. म्हणजेच त्यांनी टूर्नामेंटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
BCB ला किती कोटींचं नुकसान ?
मात्र या निर्णयाची बांगलादेश क्रिकेट बोर्डाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. रिपोर्ट्सनुसार, आयसीसीकडून मिळणारा वार्षिक रेव्हेन्यू शेअरमध्ये 3.25 अब्ज बांगलादेशी टाका (अंदाजे 27 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किंवा 240 कोटी रुपये) इतका कमी होऊ शकतो. त्याशिवाय, चालू आर्थिक वर्षात प्रसारण हक्क, प्रायोजकत्व आणि इतर महसुलातून होणारे एकूण आर्थिक नुकसान 60 टक्के किंवा त्याहून अधिक असू शकते. खेळाडूंना सामना शुल्क, बोनस आणि बक्षीस रकमेपासूनही वंचित ठेवले जाईल. म्हणजेच त्यांना जवळपास 240 कोटी रुपयांचे तगडे नुकसान होऊ शकतं.
भारत-बांग्लादेश सीरीजवरही होणार परिणाम
या वादाचा दोन्ही देशांतील क्रिकेटवरही परिणाम होऊ शकतो. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणारा बांगलादेश दौरा भारत रद्द करू शकतो, कारण टीव्ही प्रसारण हक्कांच्या बाबतीत ही मालिका उर्वरित 10 द्विपक्षीय सामन्यांइतकीच महत्त्वाची मानली जाते. अशा परिस्थितीत बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आणखी नुकसान सहन करावे लागू शकते. टीम इंडियाचा दौरा 2025 मध्ये होणार होता, परंतु बीसीसीआयने तो पुढे ढकलला. पण या महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले, जे आता अडचणीत सापडू शकतं.