
Smriti Mandhana Marriage : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने आपले लग्न रद्द केल्याचे जाहीर केले आहे. तिचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 दिग्दर्शक पलाश मुच्छलसोबत होणार होते. विशेष म्हणजे या लग्नाची महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात जोमात तयारी करण्यात आली होती. स्मृतीच्या संघातील खेळाडू तसेच वधू आणि वाराकडील पाहुणे मंडळीही या लग्नाला आले होते. पण अवघ्या काही तासांवर लग्न आलेले असताना स्मृतीच्या विडिलांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यानंतर स्मृती-पलाश यांचे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर आता स्मृतीनेच स्वत समोर येत आमचे लग्न रद्द झाले आहे, अशी माहिती दिली आहे. दरम्यान, हे लग्न मोडल्यानंतर स्मृती आणि पलाश यांच्यात प्रेम कसे झाले? पलाशने स्मृतीला लग्नासाठी कधी मागणी घातली होती? हे सविस्तर जाणून घेऊ या…
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे 23 नोव्हेंबर 2025 रोजी लग्न होणार होते. त्याआधी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना आजारी पडले. त्यानंतर हे लग्न लांबणीवर पडले आता. 7 डिसेंबर रोजी स्मृतीनेच आमचे लग्न रद्द झाले आहे, असे सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्मृती आणि पलाश हे एकमेकांना 2019 सालापासून डेट करत होते. पलाशचे इन्स्टाग्राम खाते पाहिल्यानंतर ते 2019 सालापासून सोबत होते, असे दिसते. त्यांनी अनेकदा एकत्र वाढदिवस साजरा केलेला आहे.
मार्च 2023 रोजी आरसीबीने डब्ल्यूपीएल ट्रॉफी जिंकली. त्यानंतर पलाशने स्मृती आणि डब्ल्यूपीएलच्या ट्रॉफीचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर हळूहळू त्यांचे नाते सर्वांसमोर आले.
जुलै 2024 रोजी स्मृती आणि पलाश यांनी आपल्या नात्याचा पाचवा वाढदिवास साजरा केला. त्याचेही काही फोटोही पलाशने शेअर केले होते.
त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा जिंकली. भारताच्या या विजयात स्मृतीचे खूप योगदान होते. या विजयानंतर पलाशने स्मृतीसोबत तसेच वर्ल्ड कपच्या ट्रॉफीसोबतही काही फोटो शेअर केले. यावेळी पलाशने स्मृतीच्या जर्सीचा नंबर असलेला टॅटूदेखील शेअर केलेला पाहायला मिळाला.
पुढे पलाशने स्मृती मानधनाला 21 नोव्हेंबर 2025 रोजी लग्नासाठी मागणी घातली. स्मृतीने ज्या मैदानावर विश्वचषक जिंकला होता, त्याच मैदानावर पलाशने स्मृतीला प्रपोज केले.
लगेच 23 नोव्हेंबर ही लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. लग्नाआधी हळद समारंभ, संगीत नाईट अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.
लग्नात झालेल्या धावपळीमुळे पलाश मुच्छलला 24 नोव्हेंबर 2025 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आता 7 डिसेंबर रोजी स्मृती मानधनाने अधिकृतपणे आमचे लग्न मोडलेले आहे, असे जाहीर केले आहे.