ओव्हरटेक करणं जीवावर बेतलं, प्रसिद्ध बिकानेर हॉटेल मालकाचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू
अमरावती जिल्हयातील दर्यापूर-भातकुली मार्गावर सायत गावाजवळ झालेल्या भीषण अपघाताची सविस्तर माहिती. या अपघातात बिकानेर हॉटेलच्या मालकासह ४ जणांचा मृत्यू झाला असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात रस्ते अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी रात्री उशिरा दर्यापूर-भातकुली मार्गावर एक भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात ४ जणांचा करुण अंत झाला. सायत गावाच्या शिवारात दोन भरधाव कार एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मध्यरात्री काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, दर्यापूरकडून भातकुलीकडे जाणारी आणि विरुद्ध दिशेने येणारी अशा दोन कारची सायत गावाजवळ समोरासमोर धडक झाली. या दोन्ही गाड्यांचा वेग प्रचंड होता. हा अपघात अत्यंत भीषण होता. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही गाड्यांच्या इंजिनचा भाग पूर्णपणे चेपला गेला. यावेळी कारमध्ये असलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांना आणि पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
बिकानेर हॉटेलचे मालकाचा मृत्यू
या अपघातातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मृतांमध्ये भातकुली येथील प्रसिद्ध व्यावसायिक आणि बिकानेर हॉटेलचे मालक यांचा समावेश आहे. ते आपल्या काही सहकाऱ्यांसह प्रवास करत असताना हा अपघात झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच भातकुली शहरात शोककळा पसरली असून व्यापाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णवाहिकेने अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने त्याला खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
ओव्हरटेकिंगच्या प्रयत्नात अपघात
या घटनेची माहिती मिळताच भातकुली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रात्रीच्या वेळी रस्त्यावर पडलेला अंधार किंवा ओव्हरटेकिंगच्या प्रयत्नात हा अपघात झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दोन्ही वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून अधिक तपास सुरू आहे.
