
Rohit Sharma And Virat Kohli : भारताचे स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे आजघडीला भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. ते जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा स्टेडिममध्ये प्रेक्षागृहात बसलेले त्यांच्या नावाचा जयघोष करतात. विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरले की धावांचा अक्षरश: पाऊस पडतो. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही फक्त एकदिवसीय सामन्यांत खेळताना दिसतात. टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून त्यांनी निवत्ती घेतलेली आहे. दरम्यान, आता या दोन्ही खेळांडूना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने एक निर्णय घेतला तर या दोन्ही खेळाडूंना मिळणारा पगार कमी केला जाऊ शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना भारतीय संघाकडून खेळण्याच्या बदल्यात दिले जाणारे मानधन कमी केले जाऊ शकते. येत्या 22 डिसेंबर रोजी बीसीसीसीआयच्या एक्स्पेन्स काऊन्सिलची एक बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या मानधनावर चर्चा केली जाणार आहे. याच बैठकीत विराट आणि रोहित यांना दिल्या जाणाऱ्या पगारात कपात करण्यावर चर्चा केली जाऊ शकते. विशेष म्हणजे विराट आणि रोहितचा पगार कमी करण्यावर निर्णय झाल्यावर सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या शुबमन गिल याला मात्र चांगला फायदा होऊ शकतो.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार बीसीसीआयच्या एक्स्पेन्स काऊन्सिलची सर्वसाधारण बैठक होणार आहे. याच बैठकीत विराट आणि रोहितच्या पगारावर चर्चा केली जाईल. सध्या हे दोन्ही खेळाडू ग्रेड A+ श्रेणीमध्ये आहेत. त्यांना पुन्हा A श्रेणीमध्ये टाकायला हवे की नको? याबाबत या बैठकीत चर्चा केली जाईल. जे खेळाडू A+ ग्रेडमध्ये आहेत. त्यांना बीसीसीआय वर्षाला 7 कोटी रुपये मानधन देते. तर जे खेळाडू A श्रेणीत आहेत त्यांना बीसीसीआयकडून वर्षाला 5 कोटी रुपये दिले जातात. म्हणजेच विराट आणि रोहितचा A श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला तर त्यांना मिळणारे मानधन 7 कोटी रुपयांहून 5 कोटी रुपये होईल. विराट आणि रोहितला हा एका प्रकारे धक्काच मानला जातोय.
दरम्यान, विराट आणि रोहित यांची श्रेणी कमी करण्यात आल्यास शुबमन गिलला मात्र फायदा होऊ शकतो. शुबमन गिलला A+ श्रेणीत टाकले जाऊ शकते. त्यामुळे शुबमन गिलचा फायदाच होऊ शकतो.