विराट कोहली माझा मित्र नाही…सॉल्टच्या वक्तव्याने खळबळ, नक्की काय बिघडलं ?
आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा सलामीवीर फिल सॉल्टने नुकत्याच केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. "विराट कोहली माझा मित्र नाही " असं विधान इंग्लंडच्या या स्फोटक फलंदाजाने आरसीबीच्या 'इनसायडर शो'मध्ये म्हटलं होतं. त्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. नक्की काय प्रकरण ?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात इंग्लंडचा स्फोटक फलंदाज फिल सॉल्टला 11.5 कोटी रुपयांना संघात घेतलं होतं. तो सध्याच्या हंगामात संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीसोबत सलामीला येतोय दोघांनी अनेक विजयी खेळी खेळल्या आहेत. त्यांच्यात चांगला ताळमेळही दिसून येतो. पण या दरम्यान, सॉल्टने त्याच्या एका वादग्रस्त विधानाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. खरंतर, त्याने म्हटलं की,222 विराट कोहली त्याचा मित्र नाही. त्याने कोहलीचे वर्णन फक्त एक सहकारी असे केले. त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तो नक्की काय म्हणाला, चला जाणून घेऊया.
असं का म्हणाला सॉल्ट ?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या फ्रँचायझीच्या ‘आरसीबी इनसाइडर’ शो दरम्यान फिल सॉल्ट हाँ होस्ट मिस्टर नॅग्सशी बोलताना दिसला. या मुलाखतीत त्याला विचारण्यात आले की, ‘तू तुझ्या एका मुलाखतीत म्हणाला होतास की, आयपीएलमध्ये कोणीच मित्र नसतात. आता तू विराटसोबत खेळतोस, मग तुम्ही दोघेही मित्र आहात की नाही?” यावर उत्तर देताना सॉल्टने कोहलीला त्याचा सहकारी म्हटले. संपूर्ण मुलाखतीत वारंवार विचारले असता तो तेच सांगत राहिला. पण शेवटी सॉल्टने स्पष्टीकरण दिले आणि तो मस्करी करत असल्याचे सांगितले. “मिस्टर नॅग्स, मी आता हे स्पष्ट करतो. ज्यांच्यासोबत मी क्रिकेट खेळलो आहे ते सर्व माझे मित्र आहेत. मला तुम्हाला कोणतंही शस्त्र द्यायचं नव्हतं.” असं त्याने सांगितलं.
कोहलीसोबत यशस्वी जोडी
आयपीएल 2025 मध्ये, विराट कोहली आणि फिल सॉल्टची सलामी जोडी आरसीबीसाठी खूप यशस्वी ठरली. दोघांनीही संघाला चांगली सुरुवात देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सॉल्ट आक्रमक असला तरी, दुसऱ्या टोकाकडून कोहली त्याला पूर्ण पाठिंबा देताना दिसतो. सॉल्टच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने या हंगामात 10 सामन्यांमध्ये 168 च्या स्ट्राईक रेटने 239 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन अर्धशतकांचाही समावेश आहे. यादरम्यान त्याने 13 षटकार आणि 30 चौकार मारले आहेत.
तर दुसरीकडे, कोहलीने 10 सामन्यांमध्ये 63 च्या सरासरीने आणि 138 च्या स्ट्राईक रेटने 443 धावा केल्या आहेत. यावरून, आरसीबीला अव्वल स्थानावर नेण्यात दोघांनीही किती महत्त्वाची भूमिका बजावली आहे याचा अंदाज लावता येतो. बंगळुरूचा संघ 10 पैकी 7 सामने जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. 1 सामना जिंकल्यास त्यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल.
