IND vs SA : सीरीज जिंकण्याच्या मार्गावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या कोचच टीम इंडियाबद्दल वादग्रस्त वक्तव्य, नको ते बोलले
IND vs SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सीरीजमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. आज टेस्ट मॅचचा शेवटचा दिवस आहे. दक्षिण आफ्रिका कसोटीसह मालिका जिंकण्याच्या स्थितीमध्ये आहे. या दरम्यान दक्षिण आफ्रिकेचे कोच शुकरी कॉनराड यांनी टीम इंडियाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

India vs South Africa 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडिअमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. टीम इंडियाची अवस्था नाजूक आहे. भारताला विजयासाठी अजून 522 धावांची गरज आहे. एक दिवसांचा खेळ बाकी असून टीम इंडियाच्या 8 विकेट शिल्लक आहेत. हा कसोटी सामना जिंकणं टीम इंडियासाठी जवळपास अशक्यच आहे. भारताने ही कसोटी जिंकली तर तो मोठा चमत्कार ठरेल. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. सामन्यासह मालिका गमावण्याचं भारतीय टीम समोर संकट आहे. गवाहाटीच्या या पीचवर भारतीय फलंदाज एकदिवसही टिकून फलंदाजी करु शकलेले नाहीत. तेच दक्षिण आफ्रिकेच्या टीमने पाच पैकी चार दिवस फलंदाजी केली. पहिल्या इनिंगमध्ये दोन दिवस दक्षिण आफ्रिकन टीमने फलंदाजी केली. तिसऱ्या दिवशी अखेरच्या सेशनमध्ये टीम इंडिया ऑलआऊट झाली.
तिसऱ्या दिवशी शेवटच्या आठ ओव्हर दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी केली. चौथ्या दिवशी आफ्रिकेने दुसऱ्या डावात दोन सेशनमध्ये फलंदाजी केली. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेच्या टीमने चार दिवस बॅटिंग केली आहे. दक्षिण आफ्रिकन टीमचे कोच शुकरी कॉनराड यांनी चौथ्या दिवशी खेळ संपल्यानंतर एक धक्कादायक विधान केलं. “भारतीय टीमने मैदानावर जास्तीत जास्त वेळ घालवावा अशी आमची इच्छा होती. आम्हाला टीम इंडियाला त्यांच्या गुडघ्यावर आणायचं होतं. आम्हाला त्यांना मॅच बाहेर करायचं होतं” असं कॉनराड म्हणाले. प्रेस कॉन्फरन्समध्ये कॉनराड यांनी ग्रोवेल या इंग्रजी शब्दाचा वापर केला. याचा अर्थ होतो, ‘असहाय्य होऊन याचना करणं’
त्यावेळी विकेटवर सावली पडलेली असते
कॉनराड पुढे म्हणाले की, “आम्हाला संध्याकाळच्यावेळी नवीन चेंडू हवा होता. कारण त्यावेळी विकेटवर सावली पडलेली असते. वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळते. म्हणून आम्हाला लवकर डाव घोषित करायचा नव्हता. भारतीय फिल्डर्सनी जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवावा अशी आमची इच्छा होती. जेणेकरुन ते थकतील. त्यामुळे शेवटच्या दिवशी खेळणं त्यांच्याशी कठीण होईल”
टीम इंडियाला विजयासाठी किती धावांची गरज?
पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या टीमकडे 288 धावांची आघाडी असूनही त्यांनी दुसऱ्या डावात फलंदाजी केली. पाच विकेट गमावून त्यांनी 260 धावा केल्या. चौथ्या दिवशी शेवटच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेने 2 विकेट काढून भारताला बॅकफूटवर ढकललं आहे. आज कसोटीच्या अखेरच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 522 धावांची गरज आहे.
