Windows 10 यूजर्सला Microsoft चा इशारा, 5 कोटी कम्प्युटर्सला धोका

तुमच्या कम्प्युटरमध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 (Windows 10) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मायक्रोसॉफ्टने विंडोज 10 वापरणाऱ्या आपल्या युजर्सला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Windows 10 यूजर्सला Microsoft चा इशारा, 5 कोटी कम्प्युटर्सला धोका

मुंबई: तुमच्या कम्प्युटरमध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 (Windows 10) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मायक्रोसॉफ्टने विंडोज 10 वापरणाऱ्या आपल्या युजर्सला सतर्कतेचा इशारा दिला आहे. याचं कारण आहे या विंडोज 10 मध्ये तयार झालेला बग बिल्ड नंबर 18362.207 (KB4501375). विंडोज 10 च्या मे 2019 च्या अपडेटेड व्हर्जन 1903 मध्ये हा बग एका फीचरला नुकसान करत आहे. विंडोज 10 च्या अलिकडच्या  अपडेट KB4501375 मध्ये आधीच्या अनेक त्रुटी काढण्यात आल्या आहेत. मात्र, याचमुळं जगभरातील अनेक कम्प्युटरवर या नव्या बगच्या रुपात संकट आलं आहे.

मायक्रोसॉफ्टनं म्हटले आहे, “ज्यांच्या कम्प्युटरमध्ये व्हीपीएन (वर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) इन्स्टॉल आहे त्यांच्या सिस्टमवर या बगचा दुष्परिणाम होऊ शकतो. या बगचे वेगळेपण म्हणजे हा बग केवळ विंडोज 10 व्हर्जनलाच नुकसान करत आहे. त्याआधीच्या कोणत्याही व्हर्जनवर या बगचा परिणाम होत नाही.

एका अंदाजानुसार या बगमुळे जगभरातील जवळपास 5 कोटी कम्प्युटर संकटात आहेत. मायक्रोसॉफ्टनं आपल्या अधिकृत वेबसाईटवरही या बगची आणि त्यामुळे होऊ शकणाऱ्या धोक्यांची माहिती दिली आहे. ‘रिमोट अॅक्सेस कनेक्शन मॅनेजरकडून (RASMAN) सर्विसचं काम करणं बंद होऊ शकते आणि यात “0xc0000005” ही एरर येऊ शकते’, असं मायक्रोसॉफ्टनं म्हटलं आहे.

मायक्रोसॉफ्टच्या विंडोज 10 मधील या बगचा सर्वाधिक परिणाम व्हीपीएन प्रोफाईल ‘Always On VPN’ (AOVPN) कनेक्शनवर असणाऱ्या आणि मॅन्युअल ओन्ली व्हीपीएन प्रोफाईल्स कनेक्शनवर नाही, अशा कम्प्युटरवर होणार आहे. असं असलं तरी मायक्रोसॉफ्टनं आपल्या युजर्सला ही समस्या महिनाभरात सोडवण्याची हमी दिली आहे. मात्र, जगभरात या बगमुळे किती युजर्सला याचा फटका बसेल याची कोणतीही आकडेवारी देण्यात आलेली नाही. जगभरात विंडोज 10 वर काम करणारे जवळपास 80 कोटी कम्प्युटर आहेत. त्यामुळे वेळीच हा बग काढण्यात यश आले नाही, तर जगभरातील कम्प्युटर युजर्सवर मोठे संकट येण्याची चिन्हं आहेत.

संबंधित बातम्या:

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप डाऊन, फोटो लोड होण्यास अडथळा

या मोबाईलवर व्हॉट्सअॅप बंद होणार

गुगलकडून 30 लाख अकाऊंट बंद, तुमच्या अकाऊंटचाही समावेश?