धक्कादायक घटना! रसगुल्ला समजून खाल्ला सुअरबॉम्ब; चावल्यानंतर तोंडातच झाला धमाका
एका माणसाने रसगुल्ला खाल्ला आणि तो चावल्यावर तोंडातच त्याचा स्फोट झाला. यात त्या माणसाचा दुर्देवी मृत्यू झाला. पण परिस्थिती अशी आहे की हा रसगुल्ला मित्रानेच मित्राला खायला दिला होता. याप्रकरणी पोलिंसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सहज मित्राने काही खायला दिलं की त्यामागे आपण काही कधी पुढचा आणि मागचा विचारच करत नाही. सहज तोंडात टाकतो. कारण आपल्यापेक्षा जास्त विश्वास आपल्याला आपल्या मित्रावर असतो. पण याच विश्वासाचा घात करत मित्राने आपल्याच मित्राला असं काही खावू घातलं की त्याचा थेट मृत्यूचं झाला आहे.
ही घटना डिंडोरी जिल्ह्यातील पडरिया छांटा गावात घडली. राजेंद्र बरौतिया ( वय 35 ) असं मृत तरूणाचं नाव आहे. पोलिंसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी राजेंद्रने कुटुंबासोबत जेवणं केलं. त्यानंतर तो घराच्या अंगणात शेकोटीजवळ बसला होता. रात्री साधारण आठच्या सुमारास गावात राहणारा रामभगत बरौतिया त्याच्याकडे आला गप्पा मारू लागला. गप्पा सुरू असतानाच रामभगताने कथितपणे राजेंद्रला डुकरांची शिकार करण्यासाठी वापरला जाणारा स्फोटक पदार्थ दिला. मात्र, तो रसगुल्ला असल्याचं सांगितल्याचा आरोप आहे. राजेंद्रलाही तो गोड पदार्थच वाटला. त्यामुळे त्याने कोणतेही शंका न घेता तो तोंडाच टाकला. मात्र दाताने चावताच त्यात जोरदार स्फोट झाला.
स्फोट इतका भीषण होता की राजेंद्रच्या तोंडाला आणि जबड्याला गंभीर दुखापत झाली. अचानक झालेल्या आवाजाने घरातील लोक घाबरले. कुटुंबियांनी तातडीने त्याला ऑटोतून डिंडोरी जिल्हा रूग्णालयात नेलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले,मात्र गंभीर दुखापतीमुळे त्याला वाचवता आलं नाही. उपचारादरम्यान त्याचा मृ्त्यू झाला.
या घटनेनंतर पोलिसांनी रामभगत बरौतिया याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 आणि स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलम 3 व 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिंसांनी मृतदेहाचं पोस्टमार्टम केल्यानंतर तो कुटुंबियांच्या ताब्यात दिला.
आरोपीकडे हा स्फोटक पदार्थ कुठून आला आणि त्याने राजेंद्रला तो रसगुल्ला असल्याचं सांगून का दिला? याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे संपूर्म गावात भीतीचं वातावरणं निर्माण झालं आहे.
