भारताचे सांस्कृतिक रंग अनुभवायचे असतील, तर हे ‘मास्क फेस्टिव्हल’ नक्की बघा
भारत ही संस्कृती, परंपरा आणि लोककलांनी समृद्ध अशी भूमी आहे. प्रत्येक राज्याची स्वतःची एक वेगळी ओळख, रंग आणि लोकजीवन आहे. ही विविधता अनुभवायची असेल, तर भारतात दरवर्षी साजरे होणारे 'मास्क फेस्टिव्हल्स' एकदा तरी जरूर पाहावेत.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे धर्म, जात, भाषा, परंपरा, खाद्यसंस्कृती आणि वेशभूषा प्रत्येक प्रांतानुसार बदलते. ही सांस्कृतिक विविधता अनेक पारंपरिक सण-उत्सवांतून साकारलेली दिसते. विशेषतः काही ठिकाणी साजरे होणारे ‘मास्क फेस्टिवल्स’ हे भारताच्या सांस्कृतिक समृद्धीचं उत्कृष्ट उदाहरण आहेत. या सणांमध्ये रंगीबेरंगी मुखवटे घालून पारंपरिक नृत्य आणि कथाकथन सादर केलं जातं, जे प्रेक्षकांना भारताच्या लोककला, इतिहास आणि अध्यात्माची झलक दाखवतं.
लद्दाखचा हेमिस फेस्टीव्हल
लद्दाखमधील हेमिस मठात जुलैच्या सुरुवातीला भव्य उत्सव भरतो, ज्याला हेमिस फेस्टीव्हल म्हणतात. यावर्षी हा उत्सव 5 आणि 6 जुलै रोजी साजरा होतोय. हा उत्सव तिबेटी बौद्ध गुरु पद्मसंभव यांच्या सन्मानार्थ आयोजित केला जातो. यामध्ये भिक्षु चित्तथरारक चाम नृत्य करतात, ज्यामध्ये ते रंगीत मुखवटे घालून दुष्ट आत्म्यांवर विजय मिळवल्याचं प्रतीक दर्शवतात. या काळात लद्दाखमध्ये हवामान अनुकूल असतं, कारण इथे पावसाळा फारसा नसतो. त्यामुळे प्रवासासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे.
सिक्कीमचं पांग ल्हबसोल
सिक्कीममधील पांग ल्हबसोल उत्सव हा कांचनजंगा पर्वताच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या पर्वताला सिक्कीममधील संरक्षक देवता मानलं जातं. ल्होपा, लेपचा आणि भूटिया या आदिवासी समुदायांची संस्कृती एकत्र पाहायला मिळते. यात रंगीत मुखवटे घालून पारंपरिक नृत्य केलं जातं. हा उत्सव भाद्रपद महिन्यात म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान साजरा केला जातो.
महाराष्ट्राचं बोहाडा
महाराष्ट्रातील ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात साजरा होणारा बोहाडा उत्सव म्हणजे आदिवासी लोककलेचा एक झगमगता पर्व. वारली आणि कोकणी आदिवासी समाज देवी-देवता, राक्षस आणि प्राण्यांचे मुखवटे घालून लोकगीतांसह पारंपरिक नृत्य करतात. हा उत्सव मे महिन्यात किंवा काही भागांत ऑक्टोबरमध्ये 3 दिवस साजरा होतो.
केरळचा ओणम आणि कुम्माट्टिकली
ओणम हा केरळचा सर्वात मोठा सण असून यावर्षी 26 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान साजरा होणार आहे. या सणात कुम्माट्टिकली नावाचा लोकनृत्य प्रकार सादर केला जातो, ज्यात कलाकार रंगीत मुखवटे घालून पुराणकथा आणि निसर्गपूजेचा महिमा गातात. त्रिशूर हे ठिकाण विशेषतः कुम्माट्टिकलीसाठी प्रसिद्ध आहे.
अरुणाचल प्रदेशचे ड्री आणि द्रुबा उत्सव
ड्री फेस्टीव्हल हे जुलै महिन्यात जीरो जिल्ह्यात साजरं केलं जातं. अपातानी जमात या सणात चांगल्या पिकासाठी देवांना प्रार्थना करते. यासोबतच मोनपा जमात दरवर्षी मार्च महिन्यात ‘द्रुबा उत्सव’ साजरा करते. यामध्ये मुखवटे घालून लामांनी बौद्ध मंत्रांसह पारंपरिक नृत्य सादर करतं.
पश्चिम बंगालचं चाऊ मास्क फेस्टिवल
पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील चरिदा गावात दरवर्षी चाऊ मास्क फेस्टीव्हल साजरा केला जातो. इथे ढाकच्या थापेवर योद्ध्यांसारखी वेशभूषा करून लोक नृत्य सादर करतात आणि रामायण – महाभारतातील कथा उलगडतात. हा सण मार्च – एप्रिलमध्ये राम नवमीच्या दरम्यान आयोजित होतो आणि त्याला 150 वर्षांहून अधिक कालावधीची परंपरा आहे.