विमानाने उड्डाण केलं अन् पुन्हा खाली उतरलंच नाही, 22 दिवसांपासून गायब, नेमकं काय घडलं?
गेल्या काही काळात विमान अपघाताच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. अशातच आता एक विमान गेल्या 22 दिवसांपासून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही काळात विमान अपघाताच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. अशातच आता एक विमान गेल्या 22 दिवसांपासून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. 2 ऑगस्ट 2025 रोजी ऑस्ट्रेलियात एक छोटे प्रवासी विमान अचानक गायब झाले आहे. या विमानाबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. महत्वाची बाब म्हणजे विमान गायब होण्यापूर्वी विमानाकडून सिग्नल किंवा रेडिओवर कोणताही मेसेज मिळाला नाही. या विमानात 72 वर्षीय ग्रेगरी वॉन आणि किम वॉर्नर हे प्रवास करत होते. या प्रवाशांचं नेमकं काय झालं ते अद्याप समजलेलं नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार, टास्मानियातील जॉर्जटाऊन विमानतळावरून 12:45 वाजता ग्रेगरी आणि किम यांच्या विमानाने उड्डाण घेतले होते. या विमानाचे पहिले ठिकाण व्हिक्टोरिया होते, येथे थोडा वेळ थांबल्यानंतर ते न्यू साउथ वेल्समधील हिल्स्टन विमानतळाकडे रवाना होणार होते. बास स्ट्रेटच्या समुद्रावरून हे विमान प्रवास करणार होते. विशेष म्हणजे ग्रेगरी यांनी हे छोटे प्रवासी विमान फक्त चार महिन्यांपूर्वी खरेदी केले होते.
विमानाचा शोध सुरु
या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर संपर्क तुटला, त्यामुळे विमानतळ प्रशासनाने शोधकार्य सुरु केले. ऑस्ट्रेलियन मेरीटाईम सेफ्टी अथॉरिटी (AMSA) ने हे विमान शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. सध्या पोलिस बोटी, हेलिकॉप्टर आणि फेरी उत्तर टास्मानिया, बास स्ट्रेट आणि दक्षिण व्हिक्टोरियाच्या भागात विमानाचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप या विमानाची कोणतीही माहिती मिळालेली नाही.
जॉर्ज टाउनचे फ्लाइट इन्स्ट्रक्टर यूजीन रीड यांनी म्हटले की, उड्डाण केल्यानंतर लहान विमानांनी हवाई दलाला माहिती देणे गरजेचे आहे. मात्र ग्रेगरीने याबाबत माहिती दिली नव्हती. त्यामुळे या विमानाचा शोध घेणे कठीण होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विमानातून कोणताही आपत्कालीन सिग्नल आलेला नाही. या विमानाचा अपघात झाला असता, तर आपत्कालीन सॅटेलाईट बीकन एक्टिव्ह व्हायला हवा होता, मात्र तसे झाले नाही.
विमान बेपत्ता का झाले याचा शोध सुरु
तस्मानियाचे पोलिस निरीक्षक निक क्लार्क यांनी म्हटले की, ग्रेगरी अनुभवी पायलट होता. त्याला उड्डाणाचा चांगला अनुभव होता. मात्र हे प्रवासी विमान नवीन होते. त्यामुळे त्यात तांत्रिक बिघाड होता का? की दुसऱ्याच कारणामुळे हे विमान बेपत्ता झाले याचा शोध सुरु आहे.
