वीज का पडते? जाणून घ्या त्यामागचं विज्ञान आणि बचावाचे उपाय
सध्या अनेक राज्यांत मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटना घडत आहेत. विशेषतः डोंगराळ भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या हवामान बदलाच्या काळात आकाशात विजा कडकडण्याचं प्रमाणही वाढतं. अशा विजेपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी योग्य माहिती आणि खबरदारी आवश्यक आहे.

पावसाळ्यात आकाशात वीज कडाडते आणि ढग जोरात गडगडतात, हे दृश्य आपण अनेकदा पाहतो. पण ही वीज कशामुळे पडते? तिच्यामागे नेमकं काय विज्ञान आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अशा वेळी स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण कसं करावं? दरवर्षी देशभरात शेकडो लोक आकाशीय विजेमुळे मृत्युमुखी पडतात. म्हणूनच, आकाशीय विजेच्या धोक्याबद्दल जागरूक होणं आणि योग्य खबरदारी घेणं फार गरजेचं आहे. चला तर, यामागचं विज्ञान आणि सुरक्षेचे उपाय समजून घेऊया.
विजा नेमक्या का कोसळतात?
विजेच्या निर्मितीचं मूळ आकाशातील ढगांमध्ये असतं. ढगांमध्ये असलेले पाण्याचे अत्यंत बारीक कण जेव्हा परस्परांमध्ये घर्षण करतात, तेव्हा त्यामध्ये विद्युत भार निर्माण होतो. काही ढगांमध्ये हे चार्ज पॉझिटिव्ह (सकारात्मक) असतात, तर काहींमध्ये निगेटिव्ह (ऋणात्मक).
जेव्हा हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे विद्युत भार असलेले ढग एकमेकांशी भिडतात, तेव्हा मोठ्या प्रमाणावर विजेचा झटका तयार होतो. सामान्यतः ही वीज ढगांमध्येच राहते, पण कधी कधी तिची तीव्रता इतकी वाढते की ती जमिनीवर पडते. त्यामुळेच आपण पाहतो की कधी झाडांवर, कधी उघड्या मोकळ्या जागांवर वीज पडते आणि गंभीर अपघात होतात.
विजेपासून वाचण्यासाठी ‘या’ खबरदाऱ्या घ्या
1. वीज कडाडताना उघड्या मैदानात, गच्चीवर किंवा ओपन एरियात थांबणं टाळा. शक्य तितक्या लवकर घरात जा.
2. झाडावर वीज पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पाऊस किंवा वीज कडाडताना झाडांपासून दूर राहा.
3. स्कूटर, सायकल किंवा छत नसलेल्या वाहनांवर प्रवास करत असल्यास त्वरित थांबावं व सुरक्षित ठिकाणी जावं.
4. धातूत वीज आकर्षित करते. त्यामुळे टिन किंवा लोखंडी छताच्या खाली थांबणं टाळावं.
5. विजेचे आकर्षण इलेक्ट्रॉनिक उपकरणांकडे अधिक असते. त्यामुळे वीज कडाडत असताना मोबाइल, ब्लूटूथ किंवा इतर गॅजेट्स वापरणं टाळा.
6. मोबाइल टॉवर, वीज खांब अशा उंच धातूच्या संरचनांपासून लांब रहा. या जागांवर वीज पडण्याची शक्यता अधिक असते.
शेवटी काय लक्षात ठेवावं?
विजा निसर्गाची ताकद आहे ती रोखता येणार नाही, पण तिला ओळखून बचाव जरूर करता येतो. पावसाळ्यात जिथं वीज कडाडते, तिथं कोणत्याही निष्काळजीपणाचं मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच, हवामानाचा अंदाज लक्षात घ्या, सतर्क रहा आणि वर दिलेले उपाय नक्की पाळा. कारण सावधगिरी हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे!
