Interesting Facts: शहरांच्या नावासमोर ‘पूर’ आणि ‘बाद’ असं का लिहिले जाते? हे आहे कारण
एखाद्या शहराच्या नावाच्या शेवटी 'पूर' किंवा 'बाद' असं का लिहितात? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तुमच्यापैकी अनेकांनी शहरांच्या नावांच्या शेवटी ‘पूर’ किंवा ‘बाद’ असं लिहिलेलं नक्कीच पाहिलं असेल. नागपूर, सोलापूर, कानपूर, बदलापूर या भारतातील प्रमुख शहरांच्या नावातही ‘पूर’ या शब्दाचा उल्लेख आढळतो. हैदराबाद, गाझियाबाद, अहमदाबाद ही काही भारतातील प्रमुख शहरे आहेत, ज्यांच्या नावाच्या शेवटी ‘बाद’ असलेलं आढळतं. मात्र एखाद्या शहराच्या नावाच्या शेवटी ‘पूर’ किंवा ‘बाद’ असं का लिहितात? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शहराच्या नावाच्या शेवटी ‘पूर’ का लिहिले जाते?
भारतात अशी अनेक शहरे आणि गावे आहेत त्यांच्या नावाच्या शेवटी पूर असे लिहिलेले असते. पूर हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे. या शब्दाचा अर्थ म्हणजे शहर किंवा किल्ला. हा शब्द प्राचीन काळापासून वापरला जात आहे. ऋग्वेदातही हस्तिनापूरसारख्या प्राचीन शहरांच्या नावाचा समावेश आहे. जुन्या काळातील अनेक राजे त्यांच्या शहरांची नावे देताना त्यांच्या नावांमध्ये पूर हा शब्द जोडत असत. भावी पिढ्यांना त्यांच्या राजांची नावे लक्षात राहावीत यासाठी राजाच्या नावासमोर पूर असे जोडले जात असे. याच कारणामुळे राजा जयसिंग यांनी आपल्या शहराचे नाव जयपूर असे ठेवले असल्याचे बोलले जाते.
शहराच्या नावाच्या शेवटी ‘बाद’ का लिहिले जाते?
भारतात गाझियाबाद, अहमदाबाद, फिरोजाबाद, पाकिस्तानात इस्लामाबाद अशा नावांची शहरे आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे बाद हा शब्द ‘आबाद’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. ‘आबाद’ हा पर्शियन एक शब्द आहे ज्यामध्ये ‘आब’ म्हणजे पाणी. हा शब्द जमीन किंवा ठिकाण दर्शवते जिथे पिके घेता येतात. तसेच ही जागा अशी असावी जी राहण्यायोग्य असेल आणि पुरेसा पाणीपुरवठा असेल. याच कारणामुळे अनेक शहरांच्या नावाच्या शेवटी बाद असे लिहिलेले आहे.
बऱ्याच वेळा अनेक राजे आपल्या नावाच्या शेवटी बाद असे जोडून ते नाव शहराला द्यायचे. फिरोजाबादचे नाव फिरोजशाहच्या नावावरून ठेवण्यात आले. 1411 मध्ये सुलतान अहमद शाहने आपल्या नावावरून शहराचे नाव ‘अहमदाबाद’ असे ठेवले होते. याच कारणांमुळे बऱ्याच शहरांच्या आणि गावांच्या नावाच्या शेवटी पूर आणि बाद असे लिहिलेले आढळते.
