राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल

राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल

| Updated on: Nov 07, 2026 | 6:50 PM

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा का फेटाळल्या, असा सवाल रुपाली पाटील ठोंबरे यांनी सुनील तटकरेंना विचारला आहे. तटकरे हे झारीतले शुक्राचार्य असून त्यांनी दादांना आणि आता त्यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला, असा आरोप ठोंबरे यांनी केला आहे. महेंद्र थोरवे यांनीही तटकरेंनी पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अजित पवारांच्या निधनानंतर सुरू झालेल्या विलीनीकरणाच्या चर्चा आणि त्यावरून उद्भवलेल्या राजकीय संघर्षाने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दादांच्या निधनानंतर तटकरेंनी विलीनीकरणाच्या चर्चा तात्काळ का फेटाळल्या, असा थेट सवाल ठोंबरे यांनी विचारला आहे. गेल्या नऊ महिन्यांत असे काय घडले की तटकरे आता माध्यमांसमोर विलीनीकरणाच्या चर्चा झाल्याची कबुली देत आहेत, यावर ठोंबरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सुनील तटकरे हे झारीतले शुक्राचार्य असून त्यांनी अजित दादांनाही त्रास दिला आणि आता सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार, जय पवार यांनाही त्रास देत आहेत”, अशी तीव्र टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.

शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही या आरोपांना दुजोरा दिला आहे. तटकरेंनी राष्ट्रवादी पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न केला होता आणि उपमुख्यमंत्री व अर्थ खाते आपल्याकडे घेण्याची त्यांची इच्छा होती, असा दावा थोरवे यांनी केला आहे. विलीनीकरणाबाबतच्या कोणत्याही बैठकीला सुनील तटकरेंना बोलावले जात नव्हते, कारण अजित दादांचाही त्यांच्यावर विश्वास नव्हता, असे थोरवे म्हणाले. या संपूर्ण घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राष्ट्रवादीचे नेते मिळून निर्णय घेतील, असे म्हटले आहे.

Published on: Nov 07, 2026 6:50 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us