Ajit Pawar Death Updates : राज्याचं राजकारण अळणी, बेचव झालं! दादांच्या जाण्याने राऊतही झाले भावुक
Sanjay Raut On Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबई ते बारामती प्रवासादरम्यान झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरली आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, दिलखुलास आणि कार्यक्षम नेते म्हणून त्यांची आठवण कायम राहील. संजय राऊत यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईतून बारामतीकडे जात असताना विमान अपघातात निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर शोककळा पसरली आहे. अपघाताची बातमी समजताच, अजित पवार सुखरूप असावेत यासाठी अनेक प्रार्थना करण्यात आल्या होत्या, मात्र दुर्दैवाने त्यांच्या निधनाची बातमी निश्चित झाली.
अजित पवार हे राज्याच्या राजकारणात एक दिलखुलास, रोकठोक आणि कार्यकर्त्यांना प्रिय असलेले नेतृत्व होते. त्यांची कामाची पद्धत, प्रशासनावरची पकड आणि कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ओळख होती. राज्याच्या प्रश्नांचा, विशेषतः पाठबंधारे आणि पाणी या क्षेत्रांचा त्यांना सखोल अभ्यास होता. बारामतीशी त्यांचे जवळचे नाते होते आणि तिथेच त्यांना नियतीने गाठले, याला विचित्र योगायोग म्हटले जात आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, हे राजकारण त्यांच्याशिवाय बेचव होईल अशी भावना व्यक्त होत आहे.
