Satish Bhosale Arrest Video : सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, कुठून केली कारवाई?

Satish Bhosale Arrest Video : सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, कुठून केली कारवाई?

| Updated on: Mar 12, 2025 | 11:28 AM

खोक्या भोसले गेल्या चार दिवसांपासून फरार आहे. आज स्वतः सतीश भोसले हा पोलिसांना शरण येणार असल्याची चर्चा सुरु होती. पण त्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

गेल्या अनेक दिवसांपासून ज्यांची चर्चा सुरू होती त्या सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला अटक करण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे. बीडच्या आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा सतीश ऊर्फ खोक्या भोसले हा कार्यकर्ता आहे. गेले कित्येक दिवस पोलीस त्याचा शोध घेत होते. तो फरार होता. मात्र त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फरार असतानाच त्याच्यावर तीन गुन्हे दाखल असल्याची माहितीही समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून खोक्या भोसलेला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. सतीश भोसले आज पोलिसांना शरण जाणार होता मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. बीड पोलीस आणि प्रयागराज पोलीस यांच्या माध्यमातून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला सतीश भोसले याने अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सतीश भोसले याचे पैशांचे बंडल फेकणे, हातात, गळ्यात सोन्याचे दागिने असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात हत्यारे, शिकारीसाठी लागणारे जाळे आणि इतर साहित्य अढळून आले होते.

Published on: Mar 12, 2025 11:23 AM