Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी

Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी

| Updated on: Jun 08, 2026 | 5:01 PM

बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अचानक भेट देत रुग्णालयातील व्यवस्थेची सखोल पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, औषधांचा पुरवठा आणि एकूणच आरोग्यसेवेच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान काही त्रुटी आढळून आल्याने त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी विविध विभागांना भेट देत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी थेट संवाद साधला. उपचार, सुविधा आणि स्वच्छतेबाबत नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याचे निर्देश दिले.

रुग्णालयातील स्वच्छतेच्या स्थितीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी कर्मचाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याचा इशारा दिला. “रुग्णांसाठीच्या उशा अशा का ठेवण्यात आल्या आहेत? तुम्ही दिवसभर मोबाईलमध्येच व्यस्त असता का? स्वच्छता म्हणजे नेमकं काय हे माहिती आहे का?” असे सवाल करत त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली.

तसेच, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे नोंदवून ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्यसेवेत कोणतीही त्रुटी राहू नये आणि नागरिकांना दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, बारामती वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध तक्रारी समोर येत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी अचानक भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली असून, आगामी काळात आरोग्यसेवेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

Published on: Jun 08, 2026 5:01 PM
Follow Us