Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात देशाने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचा आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती दिली. भारताची अर्थव्यवस्था, विकासदर आणि विदेशी चलनसाठा याबाबत त्यांनी केंद्र सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीबाबत अनेकांनी मंदीची चर्चा केली होती, मात्र प्रत्यक्षात चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7 टक्क्यांहून अधिक नोंदवला गेला आहे. जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताने आपले स्थान कायम राखले असल्याचा दावा त्यांनी केला.
फडणवीस यांनी सांगितले की, भारताची अर्थव्यवस्था आता 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत आहे. देशाचा आर्थिक पाया अधिक मजबूत होत असून, जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता वाढत आहे.
याशिवाय, देशाकडे सध्या सुमारे 67 लाख कोटी रुपयांचा विदेशी चलनसाठा उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. या चलनसाठ्याच्या बळावर भारत पुढील 11 महिन्यांच्या आयातीचा खर्च भागवू शकतो. तसेच भारतावरील एकूण विदेशी कर्जापैकी सुमारे 94 टक्के कर्ज परतफेड करण्याची क्षमता देशाच्या तिजोरीत असल्याचा दावाही त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक, पायाभूत आणि जागतिक स्तरावरील प्रभाव वाढवण्यात मोठी झेप घेतल्याचे सांगत फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कामगिरीचा गौरव केला.