धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणाकडे सरकार आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या दुर्लक्षाविरोधात धाराशिवमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरासमोर मराठा बांधवांनी ठिय्या आंदोलन करत त्यांचा निषेध नोंदवला. आरक्षणाच्या मागण्या मान्य न झाल्याने मराठा समाजात अस्वस्थता वाढली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाकडे सरकार आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ धाराशिव येथे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर सकल मराठा समाजाने ठिय्या आंदोलन केले. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून, सरकारने अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाजाकडून विविध मार्गांनी आरक्षणाची मागणी केली जात आहे.
मात्र, केवळ शिष्टमंडळे पाठवून समाजाची फसवणूक केली जात असल्याचा दावा आंदोलकांनी केला. तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत किंवा मराठा आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही, तसेच एकही ट्वीट केले नाही. यापूर्वी त्यांनी आंदोलनाच्या निषेधार्थ काळा दिवस पाळला होता. त्यांच्या या वृत्तीच्या निषेधार्थ हे बोंबामारो आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलक राणा जगजितसिंह पाटलांच्या प्रतीक्षेत होते, मात्र ते उपस्थित न झाल्याने मराठा समाजाने त्यांचा तीव्र निषेध नोंदवत आंदोलन समाप्त केले.
