Dhule Rain | 137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली, प्रशासनाचा अलर्ट जारी
धुळे जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पांजरा नदीला मोठा पूर आला आहे. दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसानंतर जिल्ह्यात तब्बल 137 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्या, नाले आणि जलसाठे तुडुंब भरून वाहू लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, पांजरा नदीत सुमारे 47 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीला मोठा पूर आला. पुराच्या पाण्यामुळे नदीलगतचे दोन्ही बाजूंचे रस्ते रात्री उशिरापर्यंत पाण्याखाली गेले होते. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अनेक धरणे आणि जलसाठे पूर्ण क्षमतेने भरले असून, सततच्या पावसामुळे प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी नदीकाठच्या भागात सतर्कता कायम ठेवण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाल्यांजवळ न जाण्याचे आणि हवामान विभाग तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.