जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील मानवाडी फाटा परिसरात शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात रास्ता रोको आंदोलन केले. हा महामार्ग अनावश्यक असून, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यासाठी व भ्रष्टाचारासाठी केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जीव गेला तरी जमीन देणार नाही, अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी सरकारला आव्हान दिले आहे.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मानवाडी फाटा परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर, म्हणजेच शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र रास्ता रोको आंदोलन केले. जवळपास बावीस गावांतील शेतकऱ्यांनी जीव गेला तरी जमीन देणार नाही! अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. हा महामार्ग अनावश्यक असून, यामुळे हजारो कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे असताना या नव्या महामार्गाची गरज नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे यांनी ८६ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप करत, त्यांच्या माध्यमातून अदानी समूहाला फायदा पोहोचवला जात असल्याचा दावा केला. शेतकऱ्यांनी, दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात हा पैसा शेतकऱ्यांसाठी वापरावा अशी मागणी केली. १९५५ चा भूमी अधिग्रहण कायदा लागू करून शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले जात असल्याचाही आरोप करण्यात आला. शेतकरी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी कटिबद्ध असून, हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
