मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी परिसरात गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा टँकर महामार्गापासून सुमारे 20 फूट अंतरावर जाऊन पलटी झाला.
मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी परिसरात गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा टँकर महामार्गापासून सुमारे 20 फूट अंतरावर जाऊन पलटी झाला. अपघातानंतर टँकरमधून कार्बन डाय-ऑक्साइड वायूची गळती सुरू झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील वाहतूक काही काळ नियंत्रित करण्यात आली होती. वायू गळतीमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. टँकर चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. तसेच टँकर हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
