Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट

Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट

| Updated on: Jun 21, 2026 | 4:56 PM

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित काही कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या फोटोंच्या आधारे विविध दावे आणि आरोप केले जात असताना गिरीश महाजन यांनी हे सर्व फोटो बनावट, मॉर्फ केलेले आणि दिशाभूल करणारे असल्याचा दावा केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना महाजन यांनी संबंधित फोटो खोटे असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी काही मूळ फोटो दाखवत व्हायरल करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये डिजिटल छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला. तसेच अशा प्रकारे खोटे फोटो तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

यासंदर्भात आपण सायबर पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केल्याची माहिती महाजन यांनी दिली. “अशा प्रकारचे उद्योग करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणाच्याही प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी फोटो एडिट करून चुकीच्या पद्धतीने प्रसारित केले जात आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असे ते म्हणाले.

महाजन यांनी पुढे सांगितले की, फोटोंमध्ये फेरफार करून कोणाच्याही नावाशी किंवा व्यक्तीशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही प्रकरणांमध्ये अश्लील आणि दिशाभूल करणारे फोटोही तयार केले जात असल्याने यावर तातडीने आळा घालण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या प्रकरणाबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहून योग्य कारवाईची मागणी केली असल्याचे सांगितले. तसेच सायबर विभाग आणि पोलिस यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सध्या या प्रकरणात पोलिस आणि सायबर विभाग कोणती भूमिका घेतात आणि पुढे काय कारवाई होते, याकडे राजकीय तसेच सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 21, 2026 4:56 PM
Follow Us