माझ्या सारख्या गरीब महिलेला खासदार बनवlलं! वाघमारेंकडून शिंदेंबद्दल गौरवोद्गार
ज्योती वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे सांगितले. झोपडपट्टीतून राज्यसभेच्या उमेदवारीपर्यंतचा आपला प्रवास त्यांनी मांडला. लेक लाडकी, लाडकी बहीण योजना आणि कागदपत्रांवर आईचे नाव लावण्यासारख्या निर्णयांनी महिलांना केंद्रस्थानी आणल्याबद्दल त्यांनी शिंदे यांचे आभार मानले.
ज्योती वाघमारे यांनी आपली राज्यसभेची उमेदवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाचे प्रतीक असल्याचे म्हटले. त्यांनी शिक्षण आणि विकासासाठी काम करणाऱ्या थोर व्यक्तींना वंदन करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. वाघमारे यांनी नमूद केले की, शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना महिलांना राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले. लेक लाडकी आणि लाडकी बहीण यांसारख्या योजना सुरू केल्या, तसेच मुलींसाठी मोफत उच्च शिक्षणाची सोय केली. महत्त्वाचे म्हणजे, सरकारी कागदपत्रांवर वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लावण्याचा अधिकार महिलांना मिळाला, हा मातृत्वाचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्योती वाघमारे यांनी आपल्या खडतर प्रवासाचे वर्णन केले. सोलापूरच्या झोपडपट्टीतून, रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करून बारावीच्या परीक्षेत मागासवर्गीयांमध्ये प्रथम आलेल्या एका कष्टकरी मुलीला शिंदे यांनी दिल्लीपर्यंत पोहोचवले. ही उमेदवारी केवळ माझी नसून महाराष्ट्रातील अडीच कोटी भगिनींची आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. शिंदे हे कार्यकर्त्यांना आपले कुटुंब मानतात, असे सांगून त्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाला सलाम केला.
