Mallikarjun Kharge : खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या टिप्पणीवर देशभरात आंदोलनं
मल्लिकार्जुन खरगे यांच्या मोदी का बाप भी जाएगा या वक्तव्याने राजकीय वादळ उठले आहे. भाजपने देशभरात आंदोलने पुकारली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरगेंच्या टिप्पणीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. काँग्रेसने अपमानास्पद राजकारणाच्या मर्यादा ओलांडल्याचा आरोप भाजपने केला आहे.
पाटणा येथे एका सभेत गोंधळ घालणाऱ्या तरुणाला उत्तर देताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबद्दल वादग्रस्त विधान केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खरगे यांनी मोदी का बाप भी जाएगा असे वक्तव्य केल्याने भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. या घटनेनंतर देशभरात भाजपकडून आंदोलने पुकारण्यात आली आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर पोस्ट करत खरगेंच्या टिप्पणीचा निषेध केला. “मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींच्या वडिलांबद्दल अभद्र टिप्पणी करून सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष दररोज अभद्रतेच्या सीमा पार करत चाललाय,” असे शाह यांनी म्हटले. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. “मोदी यांच्या दिवंगत वडिलांबद्दल अपशब्द वापरून केलेली टीका काँग्रेसच्या निर्लज्जपणाची सीमा ओलांडल्याचं दर्शवते,” असे फडणवीस यांनी म्हटले. काँग्रेसच्या वारंवार पराभवामुळे त्यांच्यात निराशा वाढली असून, केवळ शिवीगाळ आणि चिखलफेकीचे राजकारण उरले असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे.
