महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांच्या आरोपांनी राजकारणात खळबळ!

महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांच्या आरोपांनी राजकारणात खळबळ!

| Updated on: Oct 29, 2026 | 12:56 PM

शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीला दोन जागांवरच समाधान मानावे लागले, तर विरोधकांनी तीन जागा जिंकल्या. या पराभवानंतर भाजपने थेट मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर खापर फोडले आहे. शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही, असा आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे, ज्यामुळे आघाडीत नवा वाद निर्माण झाला आहे.

शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन जागांवर विजय मिळवला, तर सत्ताधारी महायुतीला केवळ दोन जागांवर यश मिळाले. निवडणुकीतील या अपययानंतर आता महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी या पराभवाचे खापर थेट मित्रपक्ष शिवसेनेवर फोडले आहे. निवडणुकीत शिवसेनेकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, असा गंभीर आरोप नवनाथ बन यांनी केला आहे. पुणे आणि नागपूरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी मित्रपक्षांकडून पाठिंबा न मिळाल्याने महायुतीला नुकसान झाले.

पुण्यात शिवसेनेने ऐनवेळी सचिन सानपांना पाठिंबा दिला, ज्यामुळे महायुतीच्या एकजुटीला धक्का बसला आणि भाजपला मिळणारी मते विभागली गेली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला, त्याचाही फटका बसल्याचे भाजपचे म्हणणे आहे. शिवसेनेने युतीधर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादीला सहकार्य केले असते, तर महायुतीने पाचही जागांवर विजय मिळवला असता, असा दावा भाजपने केला आहे. मात्र, पुण्यात एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली, असे नवनाथ बन यांनी म्हटले आहे. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Oct 29, 2026 12:56 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us