मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आणखी खालावली असून डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात उपचारांचा सल्ला दिला आहे. पाटोदामधील त्यांच्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना चार सलाईन देण्यात आल्या असून वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. सायंकाळी ६ वाजता जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार असून, त्यांच्या पुढील दौऱ्याची माहिती देणार आहेत.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अधिकच खालावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांनी त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात (ICU) उपचारांची गरज असल्याचे म्हटले आहे. जरांगे पाटील सध्या पाटोदा येथे उपचार घेत असून, त्यांच्यावर गेल्या चार तासांपासून वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. आज सकाळी ते पाटोदा येथून श्रीगोंदा येथे जाण्यासाठी निघाले होते, मात्र प्रकृती बिघडल्याने ते बेशुद्ध पडले. त्यानंतर डॉक्टरांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांच्यावर उपचार सुरू केले. आतापर्यंत त्यांना चार सलाईन देण्यात आल्या आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सकांसह वैद्यकीय अधीक्षकांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली असली तरी ती अपेक्षेप्रमाणे नसल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागातील उपचारांची शिफारस करण्यात आली आहे. त्यांच्या रक्तदाब, शुगर आणि हृदयाच्या ठोक्यांवर सतत नजर ठेवली जात आहे. आज सायंकाळी ६ वाजता जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार असून, ते आपल्या पुढील दौऱ्यासंदर्भात माहिती देतील अशी अपेक्षा आहे. या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
