Pratap Sarnaik | आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास…प्रताप सरनाईक यांचा इशारा; सरकारचे पुढचे पाऊल!

| Updated on: Apr 29, 2026 | 3:08 PM

राज्य सरकारकडून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर पुढील पाऊल उचलण्यात आले असून, चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदी भाषिक चालकांकडून तसेच विविध संघटनांकडून वेळ मागण्यात आल्यानंतर आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली.

कॅबिनेट बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “1 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. या कालावधीत मराठी शिकण्यासाठी मदत व्हावी म्हणून विशेष पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. ही पुस्तिका राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल.” सरनाईक पुढे म्हणाले की, “ज्या संघटनांनी मराठी शिकण्यासाठी वेळ मागितला होता, त्यांना आता ही संधी देण्यात आली आहे. मात्र, आता त्यांची जबाबदारीही वाढली आहे. त्यांनी आपल्या स्तरावर चालकांना मराठी शिकवण्याची व्यवस्था करावी. कार्यालये, शाखा किंवा हॉलमध्ये वर्ग घेऊन मराठीचे शिक्षण देण्याची तयारी संघटनांनी दर्शवली होती.”
तसेच, या पुस्तिकेत दैनंदिन वापरातील 15 ते 16 महत्त्वाची वाक्ये समाविष्ट करण्यात आली असून, चालकांना मूलभूत मराठी समजून घेण्यासाठी ती उपयुक्त ठरणार आहे. ही पुस्तिका मोबाईलवरही उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यामध्ये QR कोडद्वारे ऑडिओ स्वरूपातही मार्गदर्शन मिळणार आहे.
“मराठी ही राज्याची राजभाषा आहे. महाराष्ट्रात राहायचे आणि व्यवसाय करायचा असेल, तर मराठी येणे आवश्यक आहे,” असे स्पष्ट करत सरनाईक यांनी मराठी भाषेच्या प्रसारासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Published on: Apr 29, 2026 03:08 PM
Follow Us