मुंबईकरांनो बाहेर पडण्याआधी बघा लोकलचं वेळापत्रक; ‘या’ मार्गावर असणार मेगाब्लॉक!
रेल्वे प्रशासनाकडून आज, रविवारी, मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. रुळांच्या देखभालीसाठी घेण्यात आलेल्या या ब्लॉकमुळे लोकल सेवांवर परिणाम होणार असून, काही गाड्या रद्द झाल्या आहेत तर काही उशिराने धावणार आहेत. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
रेल्वे प्रशासनाने आज, रविवारी, मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घोषित केला आहे. रुळांची देखभाल आणि तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे.
मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान सकाळी १० वाजून ५५ मिनिटांपासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.
हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल. या दरम्यान सीएसएमटी, वाशी, बेलापूर आणि पनवेलच्या लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांसाठी विशेष लोकलची व्यवस्था करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान पाच तासांचा जम्बो मेगाब्लॉक असेल, ज्यामुळे लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.