Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
नांदेड जिल्ह्यामध्ये दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने पिकं पूर्णतः करपली आहेत. यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी भोकर फाटीवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनोखी दुष्काळग्रस्तांची दहीहंडी साजरी केली. कोरडा दुष्काळ तातडीने जाहीर करून प्रति हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. सरकारने या गंभीर प्रश्नाकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी त्यांची कळकळीची विनंती आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे शेतीतला खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. पीकं करपून गेली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नांदेडच्या भोकर फाटीवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने ‘दुष्काळग्रस्तांची दहीहंडी’ साजरी केली.
या दहीहंडी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. त्यांनी सांगितले की, पावसाअभावी सोयाबीन, कापूस, केळी यांसारखी पीकं पूर्णपणे सुकली आहेत. जनावरांसाठी चाराही उपलब्ध नाही, त्यामुळे घरांमध्ये दूध-तूप शिल्लक राहिलेले नाही. शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे की, सरकारने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि मराठवाड्यात दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात. तसेच, प्रति हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी. कर्जमाफीच्या नावाखाली सरकार केवळ फसवाफसवी करत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला. सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी त्यांची कळकळीची विनंती आहे.
