Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
नांदेडमध्ये सक्तीच्या वसुलीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दुष्काळातही फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेल्या वसुलीमुळे संतप्त शेतकऱ्यांनी श्रीराम आणि बजाज फायनान्सच्या कार्यालयांची तोडफोड केली. नांदेड जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे हा संताप अधिक वाढला आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. श्रीराम फायनान्स आणि बजाज फायनान्सच्या कार्यालयांमध्ये घुसून क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. “नाही चलेगी, नाही चलेगी, दादागिरी नाही चलेगी,” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
दुष्काळी परिस्थिती असूनही आणि सरकारने वसुली न करण्याचे निर्देश दिलेले असतानाही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सक्तीने वसुली सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यातच नांदेड जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने शेतकरी वर्गातील संताप आणखी वाढला आहे. यामुळेच संतप्त शेतकऱ्यांनी श्रीराम फायनान्स कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेने यापुढेही फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटना गावात दिसल्यास त्यांना नागडे करून, मारहाण करून गाढवावर फिरवण्याचा इशारा दिला आहे. शेतकरी संघटनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नांदेडमधील फायनान्स कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
