पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
पुण्यानंतर आता नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयालाही बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेल आला आहे. मेलमध्ये न्यायालयाचा सहावा मजला लक्ष्य करण्यात आला आहे. या धमकीनंतर नाशिक शहर पोलीस आणि बॉम्बशोधक पथक तातडीने न्यायालयात दाखल झाले असून तपास सुरू आहे.
पुण्यातील न्यायालयाला धमकीचा मेल मिळाल्यानंतर आता नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयालाही पुन्हा धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये न्यायालयाचा सहावा मजला बॉम्बने उडवून देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या गंभीर धमकीनंतर नाशिक शहर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत.
धमकीचा मेल प्राप्त होताच, नाशिक शहर पोलिसांचे बॉम्बशोधक व नाशक पथक तात्काळ नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात दाखल झाले आहे. पथकाकडून न्यायालयाच्या परिसरामध्ये कसून तपासणी केली जात आहे. यामध्ये संशयास्पद वस्तू किंवा वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या लकी आणि अल्फा नावाच्या श्वानांच्या मदतीनेही बॉम्बशोध मोहीम राबवली जात आहे. नाशिक शहर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी सध्या सुरू आहे. हा तपास पूर्ण होईपर्यंत न्यायालयातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
