Girish Mahajan | नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गिरीश महाजन यांचं सूचक विधान, म्हणाले…
नाशिक शहरातील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येमुळे निर्माण झालेल्या अपघातांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मागील काही दिवसांत खड्ड्यांमुळे सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत असून, या पार्श्वभूमीवर शहरात पालकमंत्रीपदाच्या मागणीचे बॅनर झळकले आहेत. "छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री करा आणि शहराला खड्ड्यांतून बाहेर काढा," असा मजकूर असलेल्या बॅनर्समुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
नाशिक शहरातील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येमुळे निर्माण झालेल्या अपघातांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मागील काही दिवसांत खड्ड्यांमुळे सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत असून, या पार्श्वभूमीवर शहरात पालकमंत्रीपदाच्या मागणीचे बॅनर झळकले आहेत. “छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री करा आणि शहराला खड्ड्यांतून बाहेर काढा,” असा मजकूर असलेल्या बॅनर्समुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. “छगन भुजबळ हे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या संदर्भातील जनतेच्या भावना मी समजू शकतो. मात्र, पालकमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे आहेत आणि ते योग्य वेळी निर्णय घेतील,” असे महाजन यांनी स्पष्ट केले.
रायगडच्या पालकमंत्रीपदाविषयी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, रायगड विधान परिषद जागेच्या निर्णयावेळी या विषयावर चर्चा झाली होती. “माझ्या माहितीनुसार, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी छगन भुजबळ आणि आपल्यामध्ये दुरावा असल्याच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला. “आमच्यात कुठलाही अबोला किंवा मतभेद नाहीत. पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमातही मी स्वतः त्यांना हात धरून व्यासपीठावर घेऊन गेलो होतो. आमचे वैयक्तिक संबंध अतिशय चांगले आहेत,” असे महाजन यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नाशिकमधील रस्त्यांची दुरवस्था, वाढते अपघात आणि पालकमंत्रीपदाच्या मागणीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, मुख्यमंत्री या प्रश्नावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.