ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार… शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ९ खासदारांपैकी ६ खासदार बंडखोरी करणार असल्याच्या चर्चा आहेत. या खासदारांपैकी एक असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसमध्ये आज निकाल आला आहे. या निकालामध्ये पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ९ खासदारांपैकी ६ खासदार बंडखोरी करणार असल्याच्या चर्चा आहेत. या खासदारांपैकी एक असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसमध्ये आज निकाल आला आहे. या निकालामध्ये पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, ‘माझा शिंदे गटात जाण्याचा निर्णय अद्याप मी घेतलेला नाही, तो दोन दिवसांनी मी माझ्या मतदार संघात गेल्यावर घेईन.’ यानंतर ते त्यांच्या पुण्यातील निवासाला पोहोचले. ते घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच शिंदे सेनेत मोठी हालचाल सुरू झाल्याचे दिसत आहे.
ताज्या माहितीनुसार, शिंदेंच्या सेनेचे नाना भानगिरे ओमराजे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. ते पुण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. आता राजकारणात काही मोठे घडणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. ते भेटीनंतर बाहेर येताच माध्यामांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले, मात्र त्यांनी फक्त ओमराजेंच्या समर्थनार्थ आल्याचे सांगितले. यानंतर मावळचे खासदार श्रीरंग बारणे देखील त्यांच्या भेटीसाठी आल्याचे दिसले.
यावेळी ओमराजेंच्या पुण्यातील निवासाला पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून अनेक नेते व कार्यकर्ते त्यांच्या भेटीला येत असल्याचे समजत आहे. त्या घराबाहेर अनेक शिवसैनिकांनी गराडा घातला आहे. शिंदे गटातील सर्व कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ आल्याचे सांगितले जात आहे.
