Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी… हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल

Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी… हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल

| Updated on: Sep 26, 2026 | 3:36 PM

परभणी जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाअभावी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलस्रोत आटल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी दोन ते अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. उमला नाईक तांडा परिसरातील रहिवाशांनी स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची सरकारकडे मागणी केली आहे.

परभणी जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागांतील जलस्रोत पूर्णपणे आटले असून, यामुळे दुष्काळाचे गडद सावट पसरले आहे. बोअरवेल आणि विहिरी कोरड्याठाक पडल्याने स्थानिक नागरिकांना, विशेषतः महिलांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

उमला नाईक तांडा परिसरातील महिलांना हंडाभर पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी दररोज दोन ते अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागते. सकाळी चार वाजल्यापासूनच महिलांना पाण्यासाठी हपशांवर रांगा लावाव्या लागतात. येथील रहिवासी ललिता राठोड यांनी सांगितले की, ही परिस्थिती त्यांच्या जन्मापासूनच आहे. शाळा किंवा कॉलेजमधून घरी आल्यावर थेट पाण्यासाठी जावे लागते. गावात पाणीच उपलब्ध नसून, अनेक हपशेही बंद पडले आहेत.

या गंभीर परिस्थितीत, प्रशासनाने तातडीने पिण्याच्या पाण्याची सोय करावी आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे. ज्ञानेश्वर उंडाळ यांनी कॅमेरापर्सन सुदर्शन पाटील सह टीव्ही नाईन मराठीसाठी हे वृत्त दिले आहे.

Published on: Sep 26, 2026 3:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us