पुन्हा हुंडाबळी; पिंपरी चिंचवडमध्ये उच्चभ्रु कुटुंबातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप
पिंपरी-चिंचवडमध्ये माहेरच्या संपत्तीत हिस्सा मागण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिल्पा गवारे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, तिच्या भावाने पती, सासू, सासरे आणि दीर यांच्या विरोधात शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. वाकड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये हुंडाबळीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाकड येथील उच्चभ्रू कुटुंबातील विवाहिता शिल्पा गवारे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. माहेरच्या संपत्तीतील हिस्सा मागण्याच्या मागणीवरून त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता, असा गंभीर आरोप शिल्पाच्या भावाने केला आहे. या प्रकरणी पती, सासू, सासरे आणि दीर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शिल्पा गवारे यांचा काल रात्री गळफास घेऊन मृत्यू झाला. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी बहिणीने जगाचा निरोप घेतल्याने भावाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या बहिणीचा सासरच्या मंडळींकडून, विशेषतः उत्तम गवारे, संजीवनी गवारे आणि सचिन गवारे यांच्याकडून प्रचंड छळ करण्यात आल्याचे भावाने सांगितले. दारू पिऊन मारहाण करणे आणि भावाला सही का दिलीस? यावरून सतत त्रास दिला जात होता, असे भावाचे म्हणणे आहे. वाकड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
