Pune | ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली मोठा घोटाळा? पुण्यात 120 कर्मचाऱ्यांच्या कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा!
पुण्यातील हडपसर परिसरातील एका कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकत मोठ्या ऑनलाइन गेमिंग फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या कॉल सेंटरच्या माध्यमातून ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान या कॉल सेंटरमध्ये सुमारे 120 कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित कागदपत्रे, संगणकीय माहिती आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले असून तपास सुरू आहे.
तपास यंत्रणा आता हे कॉल सेंटर नेमके कधी सुरू झाले, आतापर्यंत किती लोकांशी संपर्क साधण्यात आला, त्यापैकी किती जण फसवणुकीच्या जाळ्यात अडकले आणि एकूण किती रकमेची फसवणूक झाली, याचा शोध घेत आहे.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विविध ऑनलाइन गेमिंग अॅप्सवर भेट देणाऱ्या आणि आपले मोबाईल क्रमांक नोंदवणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला जात होता. त्यानंतर आकर्षक ऑफर्स, बोनस किंवा आर्थिक लाभाचे आमिष दाखवून त्यांना ऑनलाइन व्यवहार करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचा संशय आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, फसवणुकीच्या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.