याची देही, याची डोळा… ऐसा देखिला अलौकिक सोहळा! रायगडावर शिवराज्याभिषेकासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर भव्य आणि ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले असून, संपूर्ण गड परिसर शिवमय वातावरणाने भारावून गेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर भव्य आणि ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले असून, संपूर्ण गड परिसर शिवमय वातावरणाने भारावून गेला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर शिवप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून, प्रत्येकाच्या मनात शिवरायांविषयीची श्रद्धा आणि अभिमान स्पष्टपणे दिसून येत आहे.
यावेळी संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. पारंपरिक धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारांच्या वातावरणात हा सोहळा पार पडला. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी हजारो शिवभक्तांनी मोठी उपस्थिती लावली. सोहळ्यानिमित्त संपूर्ण रायगड किल्ला आकर्षक फुलांच्या सजावटीने नटवण्यात आला आहे. शिवप्रेमी विविध पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले असून, गडावर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय शाहिरी कार्यक्रम, पारंपरिक कला, सांस्कृतिक सादरीकरणे आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवराज्याभिषेकाच्या या अलौकिक सोहळ्याने उपस्थित शिवभक्त भारावून गेले आहेत. “याची देही, याची डोळा ऐसा देखिला सोहळा” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. शिवरायांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या इतिहासाची आठवण करून देणारा हा सोहळा शिवभक्तांसाठी अविस्मरणीय ठरत आहे.
