Raj Thackeray | शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून, आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटीपासून नाशिकमधील खड्डे, प्रशासनाची कार्यपद्धती, कंत्राटदार आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवरून सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधत, “शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? दुसऱ्यांच्या आया-बहिणी काढण्याचा अधिकार त्यांनाच आहे का?” असा सवाल उपस्थित केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून, आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटीपासून नाशिकमधील खड्डे, प्रशासनाची कार्यपद्धती, कंत्राटदार आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवरून सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधत, “शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? दुसऱ्यांच्या आया-बहिणी काढण्याचा अधिकार त्यांनाच आहे का?” असा सवाल उपस्थित केला.
नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरही राज ठाकरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. “तुमच्या माध्यमातून आमच्या कानावर गोष्टी येतात. शहरात खड्डे पडले आहेत. त्यात माणसं गेली. पण प्रशासन ढिम्म आहे. माणसं मेल्याचं, गेल्याचं त्यांना सोयरसुतक नाही. फक्त कमिशन कसं मिळेल, हाच भाग सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला. नाशिकमधील रस्ते आणि विकासकामांच्या कंत्राटांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत, अनेक कंत्राटदार गुजरातचे असल्याचा दावा केला. “महाराष्ट्रात कंत्राटदार जन्मालाच आले नाहीत, असा भाग आहे,” अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
राज ठाकरे यांनी राज्यातील विकासकामांमध्ये वरून आदेश येण्याच्या पद्धतीवरही निशाणा साधला. महाराष्ट्रातील अनेक गोष्टी वरून आदेश आल्यानंतरच केल्या जातात, असा आरोप करत त्यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनाचाही संदर्भ दिला. “आम्ही केलेल्या गोष्टींची वाट लावली जात आहे. दुसऱ्याने केली म्हणून वाट लावली जात आहे. स्मार्ट सिटींचं काय झालं? त्या कुठे गेल्या? सर्व शहरं बरबाद होताना दिसत आहेत,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
निवडणुकांच्या प्रक्रियेवरही राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केले. ज्या पद्धतीने निवडणुका हाताळल्या जात आहेत, ती पद्धत फ्रॉड असल्याचा आरोप करत, या गोष्टी मतदारांनाही समजल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले. नाशिकमध्ये झाडांची कत्तल होत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे सांगत त्यांनी, “तरीही लोक भाजपला निवडून देत असतील तर भोगा,” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरही राज ठाकरे यांनी सरकारला घेरले. खासगी कोचिंग क्लासेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, नीट पेपरफुटीचा संबंध खासगी कोचिंग क्लासेसशी असल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची सरकारने दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे भाजपवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. “प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या झाल्या आहेत. प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचं आहे. शत्रू संपवण्याची प्रक्रिया भाजपमध्ये सुरू झाली आहे,” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. त्यामुळे नाशिक दौऱ्यात राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी, खड्डे, प्रशासन, विकासकामे आणि निवडणूक प्रक्रियेच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केल्याने त्यांच्या या वक्तव्यांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
